तुरा आलेला ऊस तोडण्यासाठी मजूरांची टाळाटाळ; तुऱ्यामुळे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

शेतात शिल्लक राहिलेल्या ऊसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून ऊसतोड मजूर मागतील तेवढी किंमत खुशाली म्हणून देऊन ऊस कारखान्याला घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  कोल्हापूर : सध्या कारखान्याचा (Sugar Factory) गळीत हंगाम सुरू असून काही भागात ऊसतोड अंतिम टप्प्यात आली आहे. ऊसतोड मजुरांचा तुटवडा त्याचबरोबर यावर्षी जास्त दिवस परतीच्या पावसाने (Rain) तळ ठोकल्याने बऱ्याचशा शेतात पाणी (Water) साचून राहिल्याने उथळ व निचऱ्याच्या जमिनीत असलेल्या नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पीक वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने शेतात शिल्लक राहिलेल्या ऊसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून ऊसतोड मजूर मागतील तेवढी किंमत खुशाली म्हणून देऊन ऊस कारखान्याला घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र उसाला तुरा आल्याने तुरा आलेला ऊस तोडण्यासाठी ऊसतोड मजूर टाळाटाळ करत आहेत.

  मागील काही वर्षापासून ऊसतोड मजुरांपासून पासून ते ट्रॅक्टर ड्रायव्हर हे खुशाली दिल्याशिवाय शेतात पायच ठेवत नसल्याने त्यांना पैसे देऊनच उत्तर घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अगोदरच ऊस तोडणीसाठी टोळी मालकाच्या मागे लागावे लागते आणि टोळी मालक ही ज्या ठिकाणी खुशाली जास्त मिळेल अशाच ठिकाणी पहिली तोड देतात मात्र सर्वसामान्य शेतकरी हा पैशाअभावी मस्टर प्रमाणेच ऊसतोड येईल तेव्हाच घेऊया म्हणून ऊसतोड येण्याची वाट बघतो त्यामुळे जास्त दिवस शेतात ऊस राहिल्याने त्याला तुरे येतात आणि तुरे आलेला ऊस तोडायचे म्हटले की ऊसतोड मजूर उसाचा फड बघण्यासाठी शेतात येतात व शेतमालकाला म्हणतात ऊसाला वाडेच नाही. त्यामुळे एकरावर ठरल्याप्रमाणे पैसे द्यावे लागतील शेतकऱ्याला पैसे देऊन ऊस घालविण्याशिवाय पर्याय नसल्याने तोही तयार होतो मात्र एवढ्यावरच न थांबता उसाने भरलेले वाहन शेतातून रस्त्यावर काढण्यासाठी ट्रॅक्टर अथवा जेसीबी मागवला जातो त्याचाही खर्च शेतकऱ्याला द्यावा लागतो या सगळ्याचा विचार करता पदरी काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

  तोडणीसाठी मजुरांकडून एकराला चार ते पाच हजार

  ऊस तोडीसाठी ऊसतोड मजुरांची कमतरता असल्याने ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजुरांकडून एकराला चार ते पाच हजार रुपये घेतले जातात. हे खुशालीचे पैसे मागत असताना ऊसतोड मजूर हे उसाला वाढे नसल्याचे अथवा इतर काहीतरी कारण सांगून पैसे उकळतात.

  सर्वच बाजूने शेतकऱ्याची कुचंबणा

  ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरची सर्व जबाबदारी टोळी मालकावर असते तरीही ट्रॅक्टर ड्रायव्हर ही खेपेला दोनशे ते तीनशे रुपये चहा पाण्यासाठी म्हणून घेतो. काही शेतकऱ्यांनी ड्रायव्हरला चहा पाण्यासाठी एेन्ट्री देण्यास नकार दिला तर मुद्दामच शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी इतर ट्रॅक्टर अथवा जेसीबी बोलवण्यास सांगितले जाते त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्याला सोसावा लागतो त्यामुळे सर्वच बाजूने शेतकऱ्याची कुचंबणा होत आहे.

  नियम फक्त कागदावरच

  ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड होऊ नये यासाठी साखर आयुक्तांनी नियम केला होता. जो वाहनचालक अथवा ऊसतोड मजूर शेतकऱ्याकडे ऊस तोडण्यासाठी पैशाची मागणी करेल त्याची तक्रार कारखाना प्रशासनाकडे करावी. मात्र कारखान्याकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.