Solapur ZP
Solapur ZP

आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने परिचारिकांचे योगदानच बेदखल केल्याचे दिसून येत आहे. परिचारिका दिनाचा झेडपीच्या आरोग्य विभागाला विसर पडल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

  सोलापूर / शेखर गोतसुर्वे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने परिचारिकांचे योगदानच बेदखल केल्याचे दिसून येत आहे. परिचारिका दिनाचा झेडपीच्या आरोग्य विभागाला विसर पडल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

  12 मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो. परिचारिका म्हणजेच नर्सेस. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. १९७१ साली लंडन येथे आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये अनेक देशातील प्रतिनिधी एकत्र जमले होते. या परिषदेच्या अध्यक्ष फ्लॉरेन्स नाइटिंगेल या होत्या. त्यांची नर्सिंग क्षेत्रामधील आरोग्य विषयक कामगिरी भरीव होती. म्हणूनच १२ मे हा त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो.

  परिचारिका म्हणजे डॉक्टर रुग्णांना औषधोपचार देत असतात; मात्र, ते औषधोपचार वेळच्या वेळी देणे, रुग्णांची काळजी घेणे, रुग्णांची स्वच्छता ठेवणे हे ज्या व्यक्ती काम करतात त्यांना परिचारिका म्हणतात.

  हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण भरती होतात, त्यांना विविध प्रकारचे आजार असतात. काहीना संसर्गजन्य आजार असतात, काहींचे मोठमोठे ऑपरेशन असतात, काही अपघातामध्ये जखमी होतात, काही तर किळस असणाऱ्या घटना देखील असतात. पण तरी देखील नर्स ‘रुग्ण म्हणजे आमच्यासाठी ईश्वर आहे’ असे म्हणून कार्य करतात. साथीच्या आजारात अनेक तरुण, तरुणी तसेच वयोवृद्ध मृत्युमुखी पडतात. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण करावे लागते, ही जबाबदारी नर्सेस यांची असते.

  दुर्गम भागात जाण्यासाठी वाहनांची सोय नसताना त्या आपल्या कर्तव्य धर्माचे पालन करून लसीकरण मोहिमे मध्ये सहभाग घेतात व ही मोहिमा यशस्वी करतात. त्यामुळे वर्षातून एकदा त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे ही अपेक्षा असते. सर्व क्षेत्रात प्रत्येकाच्या कामाची दखल घेण्यात येत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र, बेफिकीर राहिला आहे.

  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत 77 आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा कारभार येतो. यातून कार्यरत असलेल्या सुमारे साडेसहाशे आरोग्य सेविका ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करीत आहेत. बाळंतपण लसीकरण व रुग्णसेवा या त त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शासकीय रुग्णालय व नव्याने झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात परिचारिका दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात चांगले काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

  जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र याला अपवाद ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक व प्रशासनाच्या विभाग प्रमुख महिला अधिकारी असताना आरोग्य विभागातील महिलांचा सन्मान होणे अपेक्षित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी किंवा त्यांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करणे आवश्यक होते. परंतु आरोग्य विभागात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. गेले कित्येक दिवस आरोग्य विभागाबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

  आरोग्य कर्मचारी व नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात विभागप्रमुख अपयशी ठरत आहेत असे दिसून येत आहे. ते कार्यालयात केव्हा असतात याची शाश्वती कोणालाच देता आलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागात सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था पाहून नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

  सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल झाली नसल्यामुळे परिचारिका दिन पुरस्कार सोहळा घेण्यात आला नाही. जून नंतर पुरस्कार सोहळा घेण्यात येणार आहे.

  – डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्यधिकारी, जिल्हा परिषद