आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी; विठ्ठल मंदिरातील लाडूही महागला

आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी आहे. नाही नाही म्हणत अखेर मंदिर समितीने नवीन टेंडरमध्ये विठुरायाच्या लाडू प्रसादात तब्बल दीडपटीने वाढ केल्याने गोरगरीब भाविकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे(Laddu in Vitthal temple also became expensive).

    पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल भक्तांचे तोंड कडू करणारी बातमी आहे. नाही नाही म्हणत अखेर मंदिर समितीने नवीन टेंडरमध्ये विठुरायाच्या लाडू प्रसादात तब्बल दीडपटीने वाढ केल्याने गोरगरीब भाविकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे(Laddu in Vitthal temple also became expensive).

    गेल्या सहा महिन्यापासून मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे आधी भाविकांना लाडू प्रसाद मिळालेला नाही. यानंतर नवीन टेंडरनुसार लाडूचे दर जवळपास दीडपट वाढवल्याने याचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार आहे. मंदिर समितीने लाडू बनविण्यासाठी ठेका देताच लाडूच्या किमतीत दीडपट वाढ झाल्याचे मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी सांगितल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

    गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाला होता. आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतो असे वारकरी सांगतात.

    वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात हा लाडू प्रसाद समितीने बंद केला होता. मंदिर सुरू होऊनही लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांच्या नाराजी होती. आता आषाढीपूर्वी लाडू देण्याची तयारी असून लाडू प्रसाद मात्र 20 रुपये होणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

    खरंतर यावेळी लाडूचे वजन 140 ग्रॅम केल्याचे कारण देत किंमत वाढल्याचे औसेकर सांगत असले तरी पूर्वीचे लाडू देखील 140 ग्रॅम वजनाचेच होते आणि त्यांची किंमत 15 रुपये होती. पूर्वीचे ठेकेदार 140 ग्रॅम वजनाचे 2 लाडू पॅकिंग करून 12 रुपये 50 पैसेनुसार मंदिर समितीला देत होते. आता त्याच वजनाच्या लाडूसाठी भाविकांचा मात्र खिसा कापला जाणार आहे. आता भाविकांचा खिसा कापून वाढलेली ही किंमत नेमकी कोणाच्या खिशात जाणार, ठेकेदार की मंदिर समिती हे पाहावे लागणार आहे.