मनपाच्या एका अधिकाऱ्याला शिव्यांची लाखोली; वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे घेत असल्याचा केला आरोप

महापालिकेच्या लिफ्टमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका अधिकाऱ्याला अतिषय खालच्या भाषेत शिव्या लिहून ठेवल्याने महापालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधान आले होते. वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे घेत असल्याचा आरोप मनपाच्या त्या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

  जळगाव : महापालिकेच्या लिफ्टमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका अधिकाऱ्याला अतिषय खालच्या भाषेत शिव्या लिहून ठेवल्याने महापालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधान आले होते. वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे घेत असल्याचा आरोप मनपाच्या त्या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

  महापालिकेतील एक अधिकारी वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे खातो, असा मजकूर कोणी अज्ञात व्यक्तीने महापालिकेच्या कॅप्सुल लिफ्टसमोरील मोठ्या लिफ्टमध्ये लिहून ठेवला आहे. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याविषयी अतिषय खालच्या भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून महापालिकेचे नगरसेवक पाकिटे घेतात, असा आरोप काही दिवसांपुर्वी एका नगरसेवकाने मनपाच्या महासभेत केला होता. त्यानंतर आता त्याच वॉटरग्रेस कंपनीकडून एक वरीष्ठ अधिकारी पैसे घेत असल्याचा मजकूर अज्ञात व्यक्तीने मनपाच्या मोठ्या लिफ्टमध्ये लिहून ठेवल्याने सोमवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती.

  सदर अधिकारी वॉटरग्रेस कंपनीकडून पैसे घेत असल्याबाबत काही कर्मचाऱ्यांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक व नागरिकांच्या सेवेसाठी नियुक्त केलेले अधिकारी अशा पध्दतीने मक्तेदारांकडून पैसे घेत असतील तर, मक्तेदाराकडून चांगले काम होणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  गेल्या महिन्यात नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी शहरातील साफसफाई होत नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. इतर नगरसेवकांनी देखील शहरातील साफसफाईविषयी महासभेत तक्रारी केल्या होत्या. परंतु अधिकारी मक्तेदाराकडून पैसे घेत असतील तर, त्या गोष्टीला मक्तेदारापेक्षा अधिकारीच जास्त दोषी आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

  …तर आयुक्तांकडे येणार संशयाची सुई

  शहरातील साफसफाईचा मक्ता वॉटरगे्रस कंपनीला देण्यात आला आहे. या मक्तेदाराकडून मनपाच्या अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप होत असेल तर, अशा अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्त डॉ. गायकवाड यांच्याकडून संबधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास त्यांच्याकडे देखील याप्रकरणात संशयाची सुई येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.