मनोज जरांगेंच्या सभेला लाखोंची गर्दी; छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातील खराडी चंदनगर येथील महालक्ष्मी लॉन्सवर सोमवार (दि. २०) रोजी सकाळी अकरा वाजता विराट सभा पार पडली. या सभेला पुणे शहर तसेच शहर परिसरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

  पुणे : सकल मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातील खराडी चंदनगर येथील महालक्ष्मी लॉन्सवर सोमवार (दि. २०) रोजी सकाळी अकरा वाजता विराट सभा पार पडली. या सभेला पुणे शहर तसेच शहर परिसरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा, डोक्यात एक मराठा लाख मराठा असे नाव असलेली गांधी टोपी अशा वेशात येथील मैदान गर्दीने खच्चून भरले होते. जमलेली गर्दी विविध प्रकारच्या घोषणा तसेच छत्रपती शिवाजी महारांचा जयघोषनांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसांडून वाहत होता. आरक्षण मिळवणारच या आत्मविश्वासाने लाखोंचा जनसमुदाय येथे लोटला होता.

  सभेची वेळ सकाळी अकरा वाजताची होती. मात्र वेळेआधीच सभास्थळी बांधव येत होते. सकाळी दहा वाजल्यापासून परिसरातील महिला मैदानावर हजर झाल्या होत्या. पुरुष महिलांच्या बरोबरच लहान मुले आणि मुली देखील सभेला आल्या होत्या. लोहगाव, मुंढवा, केशवनगर, कोंढवा, वाघोली, हडपसर, मांजरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, चंदनगर, लोणीकंद, लोणीकाळभोर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातून सभेसाठी मराठा बांधव आले होते.

  सकाळी अकरा वाजताची असलेली सभा साडेअकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले की सुरु झाली. त्यापूर्वी मैदानात जमलेले बांधव घोषणा देत होते. ध्वनिक्षेपावरून विविध सूचना देण्यात येत होत्या. मंचावरून शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. त्याला संबळ वाद्याची साथ असल्याने वातावरण रोमांचक झाले होते. मंच पुष्पमाळानी सजवण्यात आला होता. त्यावर पोस्टर लावून शिवाजी महाराज, जरांगे पाटील यांचे चित्र छापले होते. मध्ये ठळकपणे लिहलेला “गरजवंत” हा शब्द बरेच काही सूचित करत होता. जरांगे पाटील आल्यावर त्यांनी मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत वंदन केले आणि थेट सभेला सुरुवात झाली. साधारण दोन तास बोलल्यानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील व्यक्ती

  सभास्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा, पेहराव करून मराठा बांधव सभेस्थळी आला होता. त्यांचे मैदानात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी मुक्त कंठाने बांधवांनी जयघोष केला. सभेपूर्वी त्यांच्या भोवती फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. वैयक्तिक, सामुदायिक फोटो काढण्यासाठी मराठा बांधव थांबून फोटो काढत होते. सभा सुरु झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील व्यक्ती मंचाच्या समोरच उभी राहून मनोज जरांगेचे भाषण ऐकत होते. त्यावेळी सभेतील एक व्यक्ती म्हणाली की, साक्षात शिवाजी महाराजच त्यांच्या रूपाने जरांगे पाटलांना आशीर्वाद देत असल्याचे चित्र आहे. सभेदरम्यान भाषण सुरु असताना मनोज जरांगे यांचे लक्ष शिवाजी महाराजांच्या वेशातील व्यक्तीवर गेले. त्याक्षणी त्यांनी बोलत असलेले आपले वाक्य मधेच थांबवत यांना बसायला खुर्ची द्या असे सांगितले.

  मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी राग

  सभेला आलेल्या नागरिकांच्या मनात मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी प्रचंड राग असल्याचे पाहावयास मिळाले. सभेला येत असताना काही गटांनी मैदानात प्रवेश करतानाच भुजबळ यांच्या विरोधात मोठ मोठ्याने घोषणा दिल्या. सभा सुरु असतानाही मध्ये मध्ये काही जण त्यांच्या विरोधात घोषणा देत होते.

  पाण्याची आणि नाष्ट्याची व्यवस्था

  मैदानाकडे जाताना प्रवेशद्वाराजवळच नागरिकांच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तसेच मैदानावर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे खोके रांगेने सर्वाना घेता येतील आणि पुरतील असे ठेवण्यात आले होते. सोबतच बिस्कीट पुड्यांचेही मोठे बॉक्स सर्वत्र ठेवण्यात आले होते.