कार्तिकीसाठी पंढरीत लाखाे भाविक दाखल ; मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच सुटला

पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा जनसागर पंढरीत दाखल होवू लागले आहे. बुधवारी (िद. २२) सुमारे अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाने पंढरपूरात जय्यत तयारी केली आहे.

  पंढरपूर :  पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा जनसागर पंढरीत दाखल होवू लागले आहे. बुधवारी (िद. २२) सुमारे अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाने पंढरपूरात जय्यत तयारी केली आहे. त्यातच सकल मराठा समाजाने विठ्ठलाच्या शासकीय महापूजा विरोधात पुकारलेले आंदोलन मागे घेतल्याने महापूजेचा पेच आता सुटला आहे. पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या हस्ते पूजा होणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात अाली. कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर गेलेली आहे. दर्शनासाठी सहा ते सात तासांचा अवधी लागत आहे.
  मंदिर समितीकडून भाविकांना अल्प दरात लाडू प्रसादाची विक्री केली जाते. यापूर्वी मंदिर समिती ठेकेदारांकडून लाडू प्रसाद तयार करून घ्यायची. यंदा मात्र मंदिर समितीने स्वतः लाडू प्रसाद तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लाडू प्रसाद विक्रीतून समितीला‌ चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे मंदिर समितीने भाविकांना पौष्टीक आणि शक्ती वर्धक लाडू प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.
  कार्तिकीसाठी सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने दहा लाख बुंदीचे लाडू तयार करण्याचे वेगाने काम सुरू आहे. यासाठी २०० पोती हरभरा डाळ, ३०० पोती साखर, १५० डबे शेंगदाण तेल वापरण्यात आले आहे. शिवाय काजू, बदाम, बेदाणा, विलायची या सुक्या मेव्याचा ही प्रमाणात वापर केला आहे.
  १४० ग्राम वजनाच्या दोन लाडूची २० रूपयांना विक्री केली जाते. लाडू प्रसाद बनवण्यासाठी जवळपास १०० स्वयंसेवक मागील आठ दिवसांपासून अहोरात्र काम करत आहेत. बुंदी लाडू प्रसादा बरोबरच दोन लाख राजगिरा लाडू देखील तयार करण्यात आले आहेत. भाविकांनी लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

  सुक्या मेव्याचा प्रथमच वापर
  बुंदी लाडू प्रसादामध्ये‌‌ प्रथमच सुक्या मेव्याचा वापर केल्याने लाडू प्रसादाची गुणवत्ता वाढली आहे. शिवाय भाविकांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आणि शक्ती वर्धक असल्याने प्रसादाला मोठी मागणी वाढली आहे.

  विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू
  कार्तिकी एकादशी व यात्रेनिमित्त मंदिर समितीने दहा लाख लाडू तयार केले आहेत. काजू, बदाम, बेदाणा, विलायची अशा पौष्टीक सुका मेव्यांचा वापर करून बुंदी लाडू प्रसाद तयार केला आहे. पौष्टिक व शक्ती वर्धक विठुरायाच्या लाडू प्रसादाला भाविकांमधून मोठी मागणी वाढली आहे. दोन दिवसात एक लाख लाडू प्रसादाची विक्री झाली आहे.