सीरम कंपनीत नोकरी लावण्याच्या अमिषाने लाखोंचा गंडा

उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना नामांकीत कंपनी सीरम इन्स्टिीट्यूटमध्ये विविध पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. जवळपास ४० हून अधिक तरुणी व तरुणांनी या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रारी केल्या आहेत.

    पुणे : उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना नामांकीत कंपनी सीरम इन्स्टिीट्यूटमध्ये विविध पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. जवळपास ४० हून अधिक तरुणी व तरुणांनी या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रारी केल्या आहेत. यावेळी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी मगेंश राजाराम पवार (रा. तुकाई दर्शन, फुरसुंगी) याच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.

    तक्रार देण्यास येथे आलेल्या एका तरूणाने माहिती दिली की, मंगेश पवारने सीरम कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंच्या रकमा वेळोवेळी घेतल्या. त्याने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. पवारने त्यांना अनुभव नसताना दोन वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र दिले. तसेच त्यांना अपॉईंटमेंट लेटरही देवुन त्यांच्यांना सीरम कंपनीचे आयडेंटिटी कार्ड दिले. परंतु, प्रत्यक्षात तरूणांना नोकरीसाठी रकमा घेऊन बनावट कागदपत्रे दिल्याचे लक्षात आले. त्यानंतर हडपसर परिसरात राहणार्‍या ४० हून अधिक तरूणांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत तरूणांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. सुमारे ६० ते ७० लाखांची युवकांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.