लक्ष्मी रस्ता येत्या सोमवारी फक्त पादचाऱ्यांसाठी; महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

    पुणे : पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येणार आहे.

    पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी महामेट्रोकडून डेक्कन मेट्रो स्थानक ते महापालिका भवन स्थानक या दरम्यान सायकली उपलब्ध करून देण्यात येणार असून, पीएमपीकडून ज्यादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

    महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन आयोजित केला जात आहे. पादचारी दिन साजरा करणारे पुणे देशातील पहिले शहर ठरले आहे. पादचारी दिनानिमित्त यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना आणि पथारी संघटनेच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

    वाहतुकीत बदल

    लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते गरुड गणपती मंडळ दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लिंबराज महाराज चौकातून (सेवासदन चौक) टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौकातून उजवीकडे वळावे. तेथून बाजीराव रस्त्यावरून इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी चितळे बंधू मिठाईवाले दुकानाजवळून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्याकडे न जाता. केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.