लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतरत्न वरुन राज ठाकरेंची कोपरखळी; म्हणाले, ‘सत्ता हाती असताना…’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या मात्र त्यांनी खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या असून भाजपला कोपरखळी दिली आहे.

    मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी उपराष्ट्रपती लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न पुरस्कार (BharatRatna Award) जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने (Central Govt) हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर सर्व देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अगदी विरोधी पक्षातील देखील अनेकांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी देखील लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या मात्र त्यांनी खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या असून भाजपला (BJP) कोपरखळी दिली आहे.

    आपल्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल खास शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी लिहिलं आहे की, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो.

    पुढे राज ठाकरे यांनी लिहिले, करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली, राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता.

    देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन ! अशा शब्दांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावत लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.