ललितनेही ५ किलो सोने खरेदी केले; भाऊ भूषण व अभिषेकच्या तपासातून माहिती

    पुणे : ड्रग माफिया ललित पाटीलने एमडीतून (मेफेड्रोन) मिळवलेल्या पैशांमधून मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केल्याची शक्यता खरी ठरली असून, त्याने ५ किलो सोने खरेदी केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. ललितचा भाऊ भूषण व मित्र अभिषेक यांच्याकडे केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. तत्पुर्वी अभिषेककडून पोलिसांनी ३ किलो सोने जप्त केले होते. त्यामुळे आरोपींनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचेही सिद्ध झाले आहे. तत्पुर्वी ललितचा शोध पोलिसांना लागलेलाच नसल्याचे दिसत आहे.
    ससून रुग्णालयाच्या गेटवर पकडण्यात आलेल्या दोन कोटी १४ लाख रुपायांच्या ड्रग्सप्रकरणात भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
    भूषण व अभिषेक यांच्याकडे पोलीस कोठडीत केलेल्या तपासातून ड्रग्स रॅकेटमधील आणखी काही नावे समोर आली आहेत. मुंबईमधील इम्रान शेख व गोलू (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाच्या व्यक्ती नाशिकमधून एमडी नेत होते. ते ड्रग्स डिलर असल्याचे समोर आले आहे. तेही मुंबईतून पसार झाले आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे.
    ललित व त्याच्या साथीदारांनी ड्रग्समधून मिळवलेल्या पैशामधून सोन्यात गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. मोठ्याप्रमाणात त्यांनी सोने खरेदी केल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ८ किलो सोने खरेदी केल्याचे समोर येत आहे. त्यात तीन किलो सोने जप्त केला. तर, भूषण व अभिषेक यांच्याकडे केलेल्या तपासात ललित यानेही ५ किलो सोने खरेदी केल्याचे समोर आले.
    ड्रग्स प्रकरणात १२ आरोपी
    पुणे पोलिसांनी पकडलेल्या २ कोटींच्या ड्रग्स प्रकरणात  आतापर्यंत तपासात १२ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यात ५ जणांना अटक झाली आहे. तर ललित फरार आहे. तसेच तिघे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा ताबा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे व इतर तिघांचा शोध सुरू आहे.