Lalit Patil escape
Drug Mafia Lalit Patil Case

    पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी ससून रुग्णालयातील निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देवकाते यांना अटक केली आहे. प्रमुख डॉक्टरांमधील दोघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. देवकाते यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ललितला मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते यांना अटक
    वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते (वय ४०) याना अटक केली असून, बंडगार्डन पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे. डॉ. देवकातेंना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी चाकणमध्ये मेफेड्रोन बाळगताना ललित पाटील याला अटक केली होती. याप्रकरणी अटक केल्यानंतर तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

    एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

    आजारी असल्याचा बहाणा करून ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याला कारागृहातून ससूनमध्ये पाठविण्यासाठी हेतूपरस्परमदत केल्याच्या संशयातून आणि आरोपींच्या संपर्कात असल्याने नुकतीच येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक केली. त्यापूर्वी येरवडा कारागृहातील कौन्सिलर तसेच एक कर्मचारी आणि ससून रुग्णालयातील शिपायाला अटक केली होती.

    २ कोटींचे मेफेड्रोन जप्त
    ससून रुग्णालयातून ललित मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी (दि. २९ सप्टेंबर) ससून परिसरात कारवाई करून ललितच्या दोन साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून २ कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित २ ऑक्टोबर रोजी ससूनमधून कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड क्रमांक १६ पोलीस बंदोबस्त असताना पसार झाला होता.
    डॉक्टरची दुसरी अटक

    दरम्यान, त्याच्या पलायनामुळे मात्र पोलिसांवरच प्रश्न निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ तब्बल दोन अधिकाऱ्यांसह १२ पोलिसांना निलंबित केले होते. त्यानंतर याप्रकरणात एक-एक अटक करण्यास सुरूवात केली. ललितच्या पलायनप्रकरणात आता डॉक्टरची दुसरी अटक झाली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

    कारागृहाचा पोलीस निलंबित
    पुणे पोलिसांनी ललित पाटीलप्रकरणात बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोन अधिकाऱ्यांसह १० पोलिसांना निलंबित केले. तर, दोन पोलिसांना अटकही केली. नुकतीच कारागृहाचा शिपाई मोईस शेखला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर त्याला कारागृह सेवेतून निलंबित करण्याचे आदेश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. मोईस व येरवडा कारागृहाचे कौन्सिलर सुधाकर इंगळेंना गेल्या आठवड्यात अटक केली. ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.