मराठा आंदोलनाचा लालपरीला धसका; पंढरपूरामधून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद

पंढरपूरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार आहे.

    पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं केली जाता आहेच . याच आंदोलनाची धग आता एसटी महामंडळालाही बसू लागलीये. काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी थेट एसटीच पेटवण्यात आली. एसटीचं हेच नुकसान थांबवण्यासाठी महामंडळाने एसटीच्या सेवेला ब्रेक लावलाय. त्यामुळे आता पंढरपूरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार आहे.

    मराठा आंदोलनाची सद्यस्थिती काय?

    मनोज जरांगे पाटील हे मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. अशात आता या आंदोलनाचं लोन राज्यभर पसरलं आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आमदार प्रकाश सोळंकी आणि जयदत्त क्षीरसागर यांची घरं पेटवली गेली. त्यांनतर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. बसेस जाळण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने बसेस न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

    राज्य सरकारचं शिष्टमंडळ जाणार

    मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गुरुवारी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जालन्याच्या आंतरवाली सराटी इथं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या शिष्टमंडळासोबत नेमके कोणते मंत्री जाणार? याबाबत स्पष्टता नाहीये. तर शिष्टमंडळासोबत राज्याचे सचिवदेखील जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघणार का ? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.