पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठा फौजफाटा; ऊस दराचा तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी आक्रमक

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अल्टिमेटम दिल्यानंतरही कारखानदारांनी मागील हंगामातील पैसे न देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरून शिरोली येथे महामार्ग रोखून धरला. कोणत्याही परिस्थितीत आता तडजोड नाही, अशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असताना, पोलीस प्रशासनाने मध्यरात्री स्वाभिमानीच्या शिरोळ आणि जयसिंगपूर मधील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

  चक्का जाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव

  तरीदेखील हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून महामार्ग रोखून धरला. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत महामार्गाने उठणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी यावेळी घेतली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य ठिकाणीहून वळवण्यात आली. आजचे चक्का जाम आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

  Swabhimani alleges that the government is planning to crush the chakka jam movement

  सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

  ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे चौथी बैठक पार पडली. या बैठकीत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्यासह साखर कारखानदारांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. या बैठकीत शेट्टी यांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेत गत हंगामातील ४०० रुपयांपैकी १०० रुपयांचा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली. यावेळी मागील वर्षीचा हिशोब पूर्ण झाला असून आता ती देता येणार नसल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले.

  large force split on the Pune-Bangalore National Highway

  परस्पर विरोधी भूमिकेमुळे बैठक फिस्कटली

  साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे ही बैठक फिस्कटली. त्यामुळे या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे स्पष्ट करून चक्काजाम आंदोलन करणारच असे जाहीर केले होते. साखर कारखानदार व सरकार हे ऊस उत्पादक शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत, अशी भूमिका स्वाभिमानीची आहे. कारखानदारांनी निर्णय न दिल्याने आज शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला.

  दहा हजारपेक्षा जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

  शिरोली राष्ट्रीय महामार्गावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दहा हजारपेक्षा जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलनाला सकाळी सुरुवात केली, यावेळी आंदोलनाची पवित्रा पाहता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधीच दुसरीकडून वळवल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्था कमी प्रमाणात दिसत होती. हजारोंच्या संख्येने असणारे शेतकरी व शेकडोंच्या संख्येने असणारे पोलीस प्रशासन यामुळे शासन शेतकऱ्याचे की कारखानदारांचे असा सवाल उपस्थित त्यांच्यातून व्यक्त होत होता,

  शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी केलेले आंदोलन

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना काल रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने त्याची पडसाद तालुक्यात आणि आंदोलन ठिकाणी दिसून येत होते. ऊसदराचे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याच्या भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केल्या, शिरोली फाट्यावर माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे दहा हजार शेतकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. परिणामी कायद्याच्या दृष्टीने हे आंदोलन चुकीचे असले तरी शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी केलेले आंदोलन योग्यच आहे असे मत उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त होत होते.

  अग्निशमनचे बंब आंदोलनस्थळी तैनात

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका घेऊन कोल्हापूर पोलीस प्रशासनाने देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५०० पेक्षा अधिक पोलीस, अग्निशमनचे बंब आंदोलनस्थळी तैनात केले होते.

  करवीर निवासिनीच्या चरणी मागणी

  महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळू दे अशी अपेक्षा करवीर निवासिनीच्या चरणी व्यक्त केली त्यानंतर आंदोलन स्थळी दाखल झाले.

  शेतकऱ्यांसाठी लढत राहणार

  राजू शेट्टी यांनी आंदोलनाला प्रारंभ होण्यापूर्वी सांगितले की, शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं आहे. मात्र, शेतकरी भावांनो मिळेल त्या वाटेने पोलिसांना चुकवून महामार्गावर या. अंबाबाईचे दर्शन घेऊन मी महामार्गावर चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. चळवळ मोडीत काढण्याचा कारखानदारांचा डाव आहे तो उधळून लावूया. हातामध्ये उसाचा बुडका घ्या आणि लुंग्या-सूनग्यांचा यांचा बंदोबस्त करा असे आवाहन केले होते.