गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक, रोहित पवारांनी दिशाभूल करू नये : डाॅ. सुनील गावडे

कर्जत, जामखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही शेतात उभा असताना लोकप्रतिनिधी मात्र दोन्ही तालुक्यातील संपूर्ण ऊस गाळप केल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डाॅ.सुनील गावडे यांनी केला आहे.

    कर्जत : कर्जत, जामखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही शेतात उभा असताना लोकप्रतिनिधी मात्र दोन्ही तालुक्यातील संपूर्ण ऊस गाळप केल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डाॅ. सुनील गावडे यांनी केला.

    याबाबत डाॅ. सुनील गावडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कर्जत, जामखेड तालुक्यातील ऊसाचे गाळपाचे नियोजन करून कर्जत तालुक्यातील अंबालिका, जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील जय श्रीराम आणि बारामती ॲग्रोच्या मार्फत ऊस रिकव्हरीला कमी असतानाही विक्रमी गाळप केल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता.

    असे सांगताना रोहित पवार यांनी पाण्याची अडचण आहे, अशा ठिकाणचा पुढच्या वर्षीचा शेतकऱ्यांचा ऊससुध्दा गाळप केल्याचा दावा केला आहे. मात्र, पवार यांचा हा दावा साफ खोटा असून, या मतदारसंघात आजही हजारो मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्याच्या नादात पवार शेतकऱ्यांच्या जिव्हाळयाचा प्रश्र असलेल्या ऊसाच्या प्रश्राची कशाप्रकारे थट्टा करू शकतात, हे यावरून दिसून येत आहे.