संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आदर्श नागरी पतसंस्थेसह सहा सहकारी बँका बुडाल्या. या पतसंस्थांमध्ये हजारो नागरिकांनी गुंतवणूक केली. परंतु, या सर्व पतसंस्थांनी आता गाशा गुंडाळून पळ काढला.

    छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेसह सहा सहकारी बँका बुडाल्या. या पतसंस्थांमध्ये हजारो नागरिकांनी गुंतवणूक केली. परंतु, या सर्व पतसंस्थांनी आता गाशा गुंडाळून पळ काढला. अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे मंगळवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महिला ठेवीदारांनी आंदोलन केले.

    उग्र झालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज केला. यावेळी पोलीस आणि ठेवीदारांच्या धक्काबुक्कीमध्ये पोलीस महिला जखमी झाल्या. विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पोलिसांनी महिलांना जाण्याची परवानगी दिली. या घटनेत दहा महिला जखमी झाल्या. या गोंधळानंतर खासदार जलील यांच्यासह ठेवीदारांचा मोठा जमाव विभागीय आयुक्तांच्या दालनासमोरील पायऱ्यांवर जमला. विभागीय आयुक्त यांनी ठेवीदारांना पैसे मिळवून देण्याचे लेखी पत्र द्यावे, याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.

    दरम्यान, या गोंधळामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली असून, आयुक्त कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. गेटवरून चढून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.