दिव्यांग तरुणाचा लातूर-मुंबई सायकल प्रवास; मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार दिव्यांगांच्या समस्या

एका पायाने दिव्यांग असलेला लातूरचा एक तरुण चक्क लातूर ते मुंबई सायकलवर प्रवास करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहे. या युवकाने आपला प्रवास मंगळवारी लातुरातून सुरू केला आहे.

    लातूर : कोणी जन्माला येतानाच दिव्यांग आहे तर कोणी विविध घटनांतून जन्माला आल्यानंतर दिव्यांग होतो. दिव्यांग बंधू-भगिनींच्या अनेक समस्या आहेत, याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे असे दिसून येते आहे. दिव्यांगांना त्यांचे आयुष्य चांगले जगता यावे यासाठी शासनाकडून मोफत कृत्रिम साहित्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, या कृत्रिम साहित्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी लातूरला केंद्र नसल्याने थेट मुंबईला जावे लागते. प्रवासात आणि अन्य मोठ्या अडचणी यामुळे दिव्यांगांना येतात. त्यांच्या या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी एका पायाने दिव्यांग असलेला लातूरचा एक तरुण चक्क लातूर ते मुंबई सायकलवर प्रवास करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहे. या युवकाने आपला प्रवास मंगळवारी लातुरातून सुरू केला आहे.

    लातूर येथील विजय मोरे असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे. २०१२ साली रेल्वे अपघातात या युवकाला आपला उजवा पाय गमवावा लागला. त्यानंतर त्याने स्वतःला कृत्रिम पाय बसवून आपला जीवनप्रवास सुरू ठेवला. मात्र, कृत्रिम पाय असल्याने जीवन जगत असताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. मात्र, पर्याय उपलब्ध नसल्याने हा त्रास सहन करावा लागतो आहे. शासनाने दिव्यांगांना इतरांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी कृत्रिम साहित्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या साहित्याचे मेंटनन्स (देखभाल व दुरुस्ती) सतत करावी लागते. लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात देखभाल आणि दुरुस्ती केंद्र नसल्याने थेट मुंबईला या दिव्यांगांना जावे लागते. प्रवास करताना यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय, यांच्यावर आर्थिक बोजाही पडतो. लातूर जिल्ह्यातही शेकडो दिव्यांग बंधू-भगिनी आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी लातूर जिल्ह्यात दिव्यांग केंद्र उभारून साहित्य देखभाल व दुरुस्ती तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या हाल आणि अपेष्टा याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी खंत विजय मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या मागणीकडे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विजय मोरे हा दिव्यांग तरुण लातूर ते मुंबई सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर करणार असून, त्याने मंगळवार ६ सप्टेंबर रोजी प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याने आपल्या या प्रवासाची सुरुवात लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली. उन, वारा, पावसाची तमा न बाळगता हा तरुण दिव्यांगांचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री महोदयांसमोर जाणार आहे.

    ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

    आपल्यावर आलेली दुर्दैवी वेळ आणि आपल्यासारख्या हजारो दिव्यांगांच्या होत असलेल्या हालअपेष्टा सहन व पाहवत नसल्याने विजय मोरे हा दिव्यांग तरुण चक्क सायकलवर लातूर ते मुंबई हा प्रवास करतो आहे. कृत्रिम साहित्य देखभाल आणि दुरुस्तीसाठी लातूरला दिव्यांग केंद्र उभारण्यात यावे, सध्या दिव्यांगांना असलेल्या ५०० रुपये या तुटपुंज्या मानधनात वाढ करण्यात यावी, दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हास्तरावर दिव्यांग महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्या घेऊन हा युवक मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

    रोज ६० किमीचा सायकल प्रवास

    लातूर ते मुंबई हे अंतर जवळपास ५५० किलोमीटर आहे. विजय मोरे या दिव्यांग युवकाने ६ सप्टेंबर रोजी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. रोज साधारणतः ६० किलोमीटर प्रवास आपण करून असून मुख्यमंत्री महोदयाना भेटणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री महोदयांना दिव्यांगांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे ते मला नक्कीच भेटतील आणि माझ्या मागण्या मान्य करतील असा विश्वास विजय मोरे यांनी व्यक्त केला आहे. मी माझ्यासाठी ही लढाई लढत नसून माझ्यासारख्या अनेक दिव्यांगांच्या हाल अपेष्टा पाहवत नाहीत यासाठी हे पाऊल उचलले असेही मोरे यांनी सांगितले.