राहुरीमध्ये वकील दांपत्याची हत्या, वकिलांमध्ये भीतीचे वातावरण

आज डॉक्टर पत्रकारांना संरक्षण आहे पण वकील हा न्याय व्यवस्थेचा भाग असून त्यांना संरक्षण का नाही त्यामुळे वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर पारित करून समस्त वकील वर्गाला न्याय द्यावा.

    नवी मुंबई : राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही रा. मानोरी, ता. राहुरी येथे राहणारे होते. सदर घटनेमुळे वकिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वकील संरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी नवी मुंबईतील वकील यांनी वाशीत एक दिवस उपोषण केले.

    राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून अचानक बेपत्ता झाले. यामुळे वकील संघटना आणि तालुक्यात खळबळ उडाली. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल होताच, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली. अथक प्रयत्नांच्या तपासानंतर तीन संशयितांना ताब्यात घेतले. तिघांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी आढाव दाम्पत्याची हत्या करून त्यांना राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमी लगत असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडांना बांधून टाकल्याचे सांगितले. आढाव दम्पत्याच्या हत्येच्या संशयावरून राहुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोन संशयित पसार झाले आहेत. आढाव यांच्या एका पक्षकारानं ही हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

    सदर घटनेमुळे समस्त वकील वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नवी मुंबईमध्ये वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करून वकील संरक्षण विधेयक मंजूर करावे अशी मागणी अजिंक्य गव्हाणे व ज्ञानेश्वर कावळे यांनी केली. वकिलांवरील भ्याड हल्ल्याचे सत्र सुरू असतानाच आता वकिलांच्या हत्या देखील सुरू झाल्या आहेत. आज डॉक्टर पत्रकारांना संरक्षण आहे पण वकील हा न्याय व्यवस्थेचा भाग असून त्यांना संरक्षण का नाही त्यामुळे वकील संरक्षण कायदा हा लवकरात लवकर पारित करून समस्त वकील वर्गाला न्याय द्यावा.

    आम्ही वारंवार ऐकत असतो की वकिलांवर हल्ले होत आहेत. त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो पण यासाठी सरकारकडून कोणतीही प्रयत्न केलेली दिसून येत नाहीत. त्यामुळे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की, सदर घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा तसेच वकील संरक्षण कायदा सरकारने लवकरात लवकर पारित करावा.