
शेळ्या - बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलीसांनी जेरबंद करत १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
इंदापूर : शेळ्या – बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलीसांनी जेरबंद करत १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांच्या कामगिरी केल्यामुळे परिसरात आशा प्रकारच्या चोरांवर काही काळापुरता का होईना वचक बसणार आहे.
नुकतेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे हे हद्दीत रात्री गस्त करत असताना बोराटेवस्ती भरणेवाडी याठिकाणी चार ते पाच जणांनी बोराटेवस्ती वरील प्रल्हाद बोराटे यांच्या शेळ्या व बोकड चोरी करुन नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांळुखे हे तात्काळ घटनास्थळी जावून भेट देत माहिती घेऊन त्याचा तपास करू लागले. त्यानंतर आरोपी हे इंदापुर दिशेकडे निघाले आहेत, अशी माहिती मिळाल्याने तात्काळ इंदापुर रोडवरून पेट्रोलिंग करत असताना आरोपीचा पाठलाग केला. त्यावेळी आरोपीनी पळुन जाण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी ही शेळगांव अंथुर्णे रोडवर जागीच सोडुन आरोपी पळुन गेले. त्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु. रजि नंबर ७७८/२०२३ भादवि कलम ३९५ ,३९२ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान त्यानंतर मिळालेल्या चार चाकी गाडीवरुन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे साळुंखे यांनी आरोपीच्या शोधण्यासाठी तपासाची चक्रे फिरवून आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संशयित आरोपी याचा अकलुज परिसरात जावून शोध घेत असताना संशियत इसम हा बावडा याठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संकपाळ व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक टेळकीकर यांच्या पथकाने आरोपीला जागीच पकडले. यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच नाव रवि महादेव चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. माळीनगर, चरवस्ती. ता. माळशिरस जि.सोलापुर ) असे सांगितले. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली.
आरोपीने चौकशीदरम्यान त्याचे ४ साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन त्याच्याकडे चौकशी करत असताना आरोपी याच्याकडून शेळी व बोकड चोरी करून विकलेल्या शेळया बोकडाचे एकुण ३०,००० रुपयांसह एकुण २,६६००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तब्बल १६ चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हे आणले आहेत. उर्वरीत आरोपी यांचा शोध अद्याप पर्यंत सुरू आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, स्थानीक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ , बाळासाहेब कारंडे, रविराज काकरे , अभिजीत एकशिंगे, पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, शैलेश स्वामी, अतुल ढेरे, निलेश शिंदे, चांदणे, गणेश कळसकर, किसन बेलदार यांनी केलेली आहे.