‘मराठा समाजाची सरकारने फसगत केलीय’; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

विधीमंडळामध्ये एकमताने आरक्षणाचा ठराव मान्य झाल्यानंतर देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मराठा समाजाची सरकारने फसगत केलीय असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने (State Govt) एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. यामध्ये एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला शिक्षणामध्ये व सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. विधीमंडळामध्ये एकमताने आरक्षणाचा ठराव मान्य झाल्यानंतर देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मराठा समाजाची सरकारने फसगत केलीय असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    विशेष अधिवेशनानंतर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “आम्ही आधीच एक पत्र अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यामधील चार प्रश्नांचा खुलासा करावा असे सांगितले होते. पण त्यांनी ते केले नाही. यापूर्वी असे आरक्षण दिलेले होते ते रद्द झाले. पुन्हा मराठा सामाजाची फसगत केली आहे. हे 10 टक्के आरक्षण देताना आधार कुठला हे सांगितले नाही. हे कायद्याच्या आधारे टिकणारे नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

    “फडणवीसांच्या काळात जशी केवळ निवडणूक काढून घेतले होती तशीच आता निवडणूक काढून घेतली जात आहे. जे बॅनर आधीच लावले होते. हे जर मराठा समाजाला पटल तर ते बॅनर राहतील. नाही तर राहणार नाहीत. परिपत्रकानंतर गुलाल उधळले गेले. दोनदा रद्द झालेले आरक्षन पुन्हा दिले. आम्ही बोलायला गेले तर बोलू दिले नाही. फसगत करणारे फसवे सरकार आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.