‘भाजप शासकीय अधिकाऱ्यांना तिकीट देणार’; अंबादास दानवे यांचा दावा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करु पाहत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

    मुंबई : सध्या राज्यभरामध्ये निवडणूकींचे वारे वाहू लागले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीसाठी सर्व पक्षांची तयारी सुरु आहे. महायुतीमधील नेत्याचा प्रचार, सभा व बैठका यांचे सत्र वाढले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील महाराष्ट्रामध्ये दौरा आहे. यावरुनच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करु पाहत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या खासदारकीच्या उमेदवारांवरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला टोला लगावला आहे. यावेळी दानवे म्हणाले, “भाजप सगळ्या विद्यमान खासदारांमध्ये बदल करु पाहत आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मैदानात उतरवण्याची सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे. भाजप जुने नेते, विद्यमान खासदार यांचे तिकीट नाकारुन काही शासकीय अधिकाऱ्यांना तिकीट देण्याच्या तयारीत आहे. भाजप देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवू इच्छित आहे, स्थानिक चेहऱ्याशी त्यांना देणेघेणे नाही. जाहिराती देण्यापेक्षा हिंमत असेल तर गावा-गावात जाऊन तेथील लोकांना फडणवीसांनी काय केले हे सांगा.” असे आव्हान अंबादास दानवे यांनी भाजपला दिले आहे.

    भाजपने प्रचार करायला सुरुवात केली असून यंदा 400 पार करण्याचा निश्चय केला आहे. अनेक माध्यमांवर त्याचबरोबर संकल्परथ व शासन आपल्या दारी अशा कार्यक्रमातून प्रचार करत असल्याचा आरोप देखील विरोधक करत आहेत. दरम्यान ‘महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे. मात्र सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये गुंतलेले आहे.’ असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.