‘अजितदादांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचलले’ : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    नागपूर : राष्ट्रवादीतील एक गट भाजपात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसून आले. परंतु, दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यानंतर शरद पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले होते. आमच्या पक्षात कोणतीही फूट नाही. अजित पवार आमचेच नेते आहेत. या विधानाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. आता यावर महाविकास आघाडीमधील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या विधानाची पाठराखण करीत अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त होणार असल्याचे सांगितले आहे.

    अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त……..

    पहाटेच्या शपथविधीनंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते, असे शरद पवारांनी अजित पवार यांच्याबाबत म्हटले आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, असे मी बोललो नव्हतो. त्यांना पुन्हा संधी नाही, असे विधानही पवारांनी केले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटाला टोला लगावला. ते म्हणाले, अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी हे पाऊल उचललं आहे.

    शरद पवार यांचे पाऊल नक्की यशस्वी होणार

    शरद पवारांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येतात. शरद पवार जिद्दीने मैदानात उतरले आहेत. अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचलले आहे. शरद पवार यांचे ते पाऊल नक्की यशस्वी होणार आहे. असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांसी बोलत होते.

     

    वडेट्टीवर म्हणाले, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या दोन खासदार आणि नऊ आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

    आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास

    शरद पवार हे देशपातळीवर ‘इंडिया’ आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीसोबत असल्याचे वडेट्टीवारांनी ठणकावून सांगितले. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्राचे आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते पुरोगामी विचारांना धरून पुढे निघाले आहेत, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. माध्यमांना त्यांच्या बोलण्यात विसंगती वाटत असली तरी आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आहे, आणि त्यांच्या वक्तव्यांमध्ये कोणतीही विसंगती दिसत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.