घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी; राजकीय नेत्यांच्या वाढत्या हत्यांवर वडेट्टीवार आक्रमक

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रची स्थिती यूपी, बिहार सारखी करून ठेवली आहे,' अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

    नागपूर : राज्यामध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या मतभेदावरुन धक्कादायक हत्या होत आहेत. मतभेदांनंतर थेट गोळीबार करत लोकप्रतिनिधीच कायदा हातात घेत आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar murder case) यांच्यावरील हल्ल्यानंतर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणावर विधानसभेचे विरोधीपक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी रोष व्यक्त करत ‘हा हल्ला सुनियोजित असल्याचा’ आरोप केला आहे. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रची स्थिती यूपी, बिहार सारखी करून ठेवली आहे,’ अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

    नागपूरमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे. या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता कारणीभूत असल्याचा धक्कादायक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    पुढे ते म्हणाले, “राज्यात एका मागून एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अशा बातम्यांपूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. बाहेर काय सुरू आहे याची जाणीव तरी आहे का? गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर कायद्याचा धाक त्यांच्यावर का राहणार ?” असा गंभीर सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.