शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर नेत्यांची दिवाळी  ; महादेव पाटील यांचा आरोप 

तासगाव बाजार समितीत बोनसच्या नावाखाली 17 लाखांचा चुराडा

  तासगाव : तासगाव बाजार समितीत कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या नावाखाली 17 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचा म्हणून पगाराच्या 20 टक्के रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात 10 टक्के रक्कमच बोनस म्हणून  दिली. उर्वरित रकमेपैकी 14 संचालकांनी प्रत्येकी 10 हजार रुपये दिवाळीचे पाकिट म्हणून घेतले. तर उरलेले जवळपास 7 लाख रुपये बाजार समिती चालवणाऱ्या नेत्याच्या घरात गेले. शेतकऱ्यांच्या घामाच्या या पैशातूनच नेत्यांनी दिवाळी साजरी केली, असा घणाघाती आरोप बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
  पाटील म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. शेतीही अडचणीत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजार समिती म्हणवून घेणाऱ्या तासगाव बाजार समितीने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यायचा म्हणून पगाराच्या 20 टक्के रक्कम मंजूर केली. कर्मचाऱ्यांना बोनस द्यायला आमचा विरोध असण्याचे काम नाही. मात्र जेवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या नावाखाली मंजूर केली तेवढी रक्कम प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना दिलीच नाही.
  मंजूर रकमेपैकी 50 टक्केच रक्कम कर्मचाऱ्यांना दिली. तर उर्वरित 50 टक्के रक्कम 14 संचालकांनी दिवाळीचे पाकिट म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांप्रमाणे आपापसात वाटून घेतले. याबाबत बाजार समितीच्या मासिक बैठकीत उघडउघड चर्चा झाली होती. या पाकीट संस्कृतीला आम्ही विरोध केला होता. आमच्या गटाच्या 4 संचालकांनी हे पाकीट घेतले नाही.
  दरम्यान, 10 हजारांचे पाकीट घेतल्यानंतर उरलेली सुमारे 7 लाख रुपयांची रक्कम बाजार समिती चालवणाऱ्या नेत्यांच्या घरात गेली. हे पैसे शेतकऱ्यांच्या कष्टाचे आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर नेत्यांनी आपली दिवाळी साजरी केली. 2004 पासून बाजार समितीत ही प्रथा सुरू असल्याचाही आरोप महादेव पाटील यांनी केला.
  पाटील म्हणाले, अगोदरच बाजार समितीच्या विस्तारित कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हा भ्रष्टाचार पचला नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या नावाखाली नेत्यांनी आपली घरे भरण्यास सुरुवात केली आहे.यावेळी आर. डी. पाटील, अरुण खरमाटे, ॲड. स्वप्नील पाटील, संभाजी चव्हाण, प्रताप पाटील, रवींद्र साळुंखे उपस्थित होते.
  नैतीकता असेल तर संचालकांनी पैसे परत द्यावेत : पाटील
  बाजार समिती फायद्यात आणण्यात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते. त्यामागे त्यांचे कष्ट असते. या कष्टाच्या बदल्यात त्यांना दिवाळी बोनस दिला जातो. मात्र या बोनसच्या वाटपात घपला करीत संचालक व नेत्यांनी आपली घरे भरली. वास्तविक जर नेत्यांना व संचालकांना कर्मचाऱ्यांच्या कष्टाची चाड असेल तर नैतीकतेवर कर्मचाऱ्यांचे पैसे परत करावेत, असे आवाहन महादेव पाटील यांनी केले.