गोळीबार प्रकरणानंतर नेते एकत्र, परंतु कार्यकर्ते एकत्रित येणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण आणि उल्हासनगरमध्ये विकास कामांचे लोकार्पण होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे देखील उपस्थित होते.

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भाजप आमदारांना भेटण्यासाठी न्यायालयात आणि आधारवाडी जेलच्या बाहेर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. गोळीबार प्रकरणानंतर भाजप कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. मात्र डॅमेज कंट्रोलसाठी केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून भरपूर प्रयत्न केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    भाजप आमदार गायकवाड यांच्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरु होती. प्रकरण इतके विकोपाला गेले की, एका जमीनीच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यात तणाव निर्माण झाला आहे. कल्याण पूर्व आणि मलंग गड मंडलच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की, सातत्याने शिंदे गटाकडून होत असलेल्या त्रासाबाबत आम्ही वरिष्ठांना कळविणार. इतकेच नाही, कोणत्याही कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांचा फोटो वापरणार नाही असाही निर्णय काही ठिकाणी घेण्यात आला.

    हे सगळे सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण आणि उल्हासनगरमध्ये विकास कामांचे लोकार्पण होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे देखील उपस्थित होते. उल्हासनगरच्या कार्यक्रमात खासदार शिंदे यांच्या कामाची स्तूती केली. असे दिसून आले की, भाजपचे हे दोन्ही नेते शिंदे गट आणि भाजप काही घडलेच नाही असे दाखवित होते. भाजप आमदार गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयात १४ फेब्रुवारी रोजी हजर करण्यात आले. या वेळी उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर आमदार गायकवाड यांची रवानगी आधारवाडी जेलला होणार त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी आधारवाडी जेलच्या बाहेर गर्दी केली होती. मात्र भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची रवानगी तळोजा जेलला झाली. भाजप कार्यकर्ते आमदार गायकवाड यांच्या पाठीशी आहेत. हे दिसून आले. एकंदरीत परिस्थिती अशी झाली आहे की, शिंदे गटातील नेत्यांमध्ये दोन्ही बाजूने डॅमेज कंट्रोल सुरु आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होणार की नाही अशी सवाल उपस्थित केली जात आहे.