बारामती औद्योगिक वसाहतीत शिकाऊ विमान कोसळले, जीवितहानी टळली 

    बारामती : बारामती औद्योगिक वसाहत परिसरात रेड बर्ड या पायलट प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीचे  शिकाऊ विमान पडल्याची घटना गुरुवारी (दि १९)सायंकाळी घडली. मात्र या अपघात शिकाऊ प्रशिक्षणार्थी बचावल्याने जीवितहानी टळली.
    रेल्वे गेटजवळ मोकळ्या जागेत हे विमान कोसळले
    बारामती औद्योगिक वसाहत परिसरात विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणारी रेडबर्ड नावाची संस्था आहे. आज सायंकाळी शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळले. बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील कटफळ रेल्वे गेटजवळ मोकळ्या जागेत हे विमान कोसळले. काही वेळानंतर रेडबस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर अपघातग्रस्त विमान प्लॅस्टिक कागदाने झाकून ठेवले होते. याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नियमाने शिकाऊ पायलट सोबत निष्णात पायलट सोबत असणे आवश्यक असताना, एकटाच शिकाऊ प्रशिणार्थी कंपनीने कसा पाठविला, हा सवाल उपस्थित केला जात आहे.
    पायलट किरकोळ जखमी
    गेल्या वर्षी इंदापूर तालुक्यात येथील एका दुसऱ्या संस्थेचे विमान कोसळले होते. पायलट शक्ती सिंग हे या अपघातात किरकोळ जखमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान रेड बर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता ,त्यामुळे सविस्तर माहिती मिळू शकली नाही