महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागांची सोडत 31 मे रोजी

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी प्रसिद्ध केले केले जाणार आहे.

    पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी प्रसिद्ध केले केले जाणार आहे.

    राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी), तर 22 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.

    महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरु आहे. आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी 27 मे रोजी मराठी, इंग्रजीत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे.

    अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत 31 मे 2022 रोजी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप 1 जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत 1 जून ते 6 जून 2022 दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 13 जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.