जरांगेंच्या सभेविषयी केलेले वक्तव्य भोवणार ?, मंत्री छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार, मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सतीश काळे यांनी वकिलांमार्फत ही नोटीस बजावली आहे.

    पुणे : मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार, मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सतीश काळे यांनी वकिलांमार्फत ही नोटीस बजावली आहे. मुंबई येथे समता परिषदेच्या मेळाव्यात मराठा समाजाच्या भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये तत्काळ मागे घेऊन माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
    नोटीसमध्ये काय नमूद केलं आहे ?
    मराठा आरक्षणाची मागणी जातीच्या किंवा व्यक्तीविरुद्ध नाही, असे असताना देखील भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. १४ ऑक्‍टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची कुचेष्टा करणारी, मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्य केली आहेत. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असूनही असे वक्तव्य करत आहात. मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहात, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
    …अन्यथा कायदेशीर कारवाई सुरू करू
    समता परिषदेच्या मेळाव्यात भाषण करताना अंतरवली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करू, असा इशारा देखील मंत्री छगन भुजबळ यांना या नोटीसमधून देण्यात आला आहे.