राज ठाकरेंचा राजकीय ‘गेम’ होण्याची शक्यता; नीलम गोऱ्हे यांचे मोठं वक्तव्य

जनतेच्या मनात स्थान मिळविण्यात विविध भूमिका बदलून देखील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार अपयशी ठरत आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका राज यांनी घेतलेली आहे. कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखी वर्तवणूक ठेवून आंदोलन करणे योग्य नाही.

  सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जनतेच्या मनात स्थान मिळविण्यात विविध भूमिका बदलून देखील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार अपयशी ठरत आहेत. सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका राज यांनी घेतलेली आहे. कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखी वर्तवणूक ठेवून आंदोलन करणे योग्य नाही. इसापनितीतील माकड आणि मगर या दोघांच्या मैत्रीच्या गोष्टीप्रमाणे भविष्यात राज ठाकरे यांचा राजकीय ‘गेम’ तर होणार नाही ना? याची दक्षता राज ठाकरे यांनी घ्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले.

  डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सध्या केंद्र सरकारने वाय सुरक्षा योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात जो बोलेल. त्याला तातडीने वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येत आहे. हे करण्यामागे राज्यातील गृह विभाग सक्षम नाही. हे दाखविण्याचा केंद्राचा हेतू आहे. सध्या राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले असल्यास हा प्रकार गंभीर आहे. परंतु, अनेक वेळा अशी धमकीची पत्रे लिहिणारे कोणी गुंड नसतात. तर रात्रीच्या वेळी मद्यपान करुन ते असे उपद्व्याप करीत असल्याचे आढळून आले आहे.

  मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची

  राज ठाकरे यांनी त्यांचा कोणी वापर तर करीत नाही ना, याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी मुंबई महापालिकेच्या निवडणूका आल्या की शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. परंतु, त्यातील एकही आरोप सिध्द झालेला नाही. मुंबई ही शिवसेनेची आहे आणि शिवसेना ही मुंबईची आहे. ही काळ्या दगडावरची केशरी रेष आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

  खासदार नवनीत राणा या उत्तम अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांना जसे संवाद बोलायला सांगण्यात
  येतात तशा त्या बोलतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हनुमान चालीसाचा वापर कोणी आयुध म्हणून करीत असेल तर चुकीचे आहे. राजद्रोह कायदा रद्द करण्यास केंद्राचा विरोध आहे. मुळात राजद्रोह कशाला म्हणायचे हा केंद्र सरकारपुढील जटील प्रश्न आहे. केंद्र सरकारविरोधात वास्तवदर्शी भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले.

  इसापनितीतील ती गोष्ट नेमकी काय ?

  एकदा मगर आणि माकडात मैत्री झाली. एके माकडाने दिलेले आंबे मगरीने बायकोसाठी घरी नेले. त्यावर बायको मगरीला म्हणाली, इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल. मला ते हवे. दुसऱ्या दिवशी मगरीने माकडाला घरी जेवायला बोलावले. त्याला पाठीवर घेवून तो नदीतून निघाला.

  मध्यभागी आल्यावर मगरीने माकडाला,माझ्या बायकोला तुझे हृदय हवे असल्याचे सांगितले. यावर त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला सांगितले कि, अरेरे..! माझे हृदय तर झाडावरच आहे. ते आणण्यासाठी दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगरीच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगरीला म्हणाले, मित्रा तू विश्वासघातकी आहेस निघ आता..! पत्रकार बैठकीत नीलम गोऱ्हे यांनी याच गोष्टीचा संदर्भ राज ठाकरे आणि भाजपा यांच्या मैत्रीविषयी दिला.