leopard caught in kalyan

अखेर १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कल्याणमध्ये (Kalyan) वन विभागाला बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात यश आलं आहे.

    कल्याण: कल्याण(Kalyan) पूर्वेत बिबट्याचा आज पहाटेपासून मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कल्याण पूर्वतील चिंचपाडा ठिकाणी लुंबिनी सोसायटीच्या आसपास बिबट्या फिरताना आढळला. आधी तो हनुमान नगरमध्ये दिसला होता. प्रज्ञा अपार्टमेंट, साईधाम सोसायटी,गणेश उद्यान, परिसरामध्ये दिसला होता. काही वेळाने तो चिंचपाडा रोडला दिसला. अखेर १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

    मलंगगड परिसरातील डोंगरातील गर्द वनराईतून बिबट्या इकडे भरकटला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. माळशेज मार्गे येणाऱ्या भाजीच्या गाडीबरोबर तो आला असावा अशा चर्चा यानिमित्ताने रंगल्या होत्या. या बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची माहिती माळाली आहे. तेथील निशांत अर्पाटमेंट लगतच्या श्रीराम अनुग्रह टॉवरमधील पहिल्या मळाच्या पॅसेज मध्ये गुरुवारी सकाळी ८.४५वा. शिरलेला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सापळे लावले होते. ड्रोन कॅमराच्या मदतीने बिबट्याच्या हालचाली टिपण्यात आल्या. तसेच बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाकडून डार्ट गनच्या मदतीची तयारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. अखेर संध्याकाळी ६.१५ वा. सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. त्यामुळे कल्याणमधल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

    बिबट्याच्या भीतीमुळे रहिवाशांनी बराच काळ दरवाजेदेखील उघडले नाहीत. वन विभागाच्या सूचनांना योग्य तो प्रतिसाद दिला नसल्याने ऑपरेशन बिबट्याला विलंब झाल्याचे समजते. पोलीस यंत्रणा बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत होती. परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची दक्षता घेतली होती. स्थानिक रहिवासी भुषण कोकणे यांनी बिबट्याला वन विभागाने जेरबंद केल्याने आम्ही आता निश्चिंत झाल्याचे सांगितले. कर्तव्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभे ठाकलेले आणि बिबट्या जेरबंद मोहीम फत्ते केलेले वन अधिकारी राजेश चन्ने आणि सहकारी यांच्या कामगिरीला अखेर यश मिळाले.