चास येथे मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

रामवाडी (चास) शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून भोजापूर खोऱ्यात संचार बिबट्याचा वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

    सिन्नर : रामवाडी (चास) शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून भोजापूर खोऱ्यात संचार बिबट्याचा वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तसंचार असून, ते मानवी वस्तीजवळ मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसत आहे.

    भोजपूर खोरे परिसरामध्ये बिबट्यांचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांकडून येथे पिंजरा लावण्याची मागणी होत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून रामवाडी (चासखिंड) परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. काही दिवसांपूर्वी बिबट्याने रामवाडी येथील अशोक रंगनाथ गोसावी यांच्या कोंबड्यावर ताव मारला होता. रब्बी हंगाम सुरू असल्याने सर्वत्र शेतातील पिकांना पाणी तसेच अन्य शेतीकामे सुरू आहेत.

    दोन दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ बिबट्या शेततळ्याजवळ दिसून आला होता. वनपाल अनिल साळवे, वनरक्षक आकाश रूपवते, चंद्रमणी तांबे, रामनाथ आगिवले यांनी रामवाडी परिसरात पाहणी करून गोसावी यांच्या मक्याच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. पहाटेच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यात अलगद अडकला.