दौंडच्या सोनवडी, नानवीज गार भागात बिबट्याचं दर्शन; वनविभागाचे कर्मचारी म्हणतात, ‘बिबट्याने हल्ला करू द्या, मग बघू…’

दौंड तालुक्यातील गार, सोनवडी, नानवीज या गावांमध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क साधला. मात्र, चक्क वन कर्मचारी सांगतोय, 'बिबट्याने माणसावर हल्ला करू द्या, मग बघू...आम्ही पिंजरा लावायचा की नाही?

    पाटस / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दौंड तालुक्यातील गार, सोनवडी, नानवीज या गावांमध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क साधला. मात्र, चक्क वन कर्मचारी सांगतोय, ‘बिबट्याने माणसावर हल्ला करू द्या, मग बघू…आम्ही पिंजरा लावायचा की नाही? वन कर्मचाऱ्यांच्या धक्कादायक विधानामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट वन विभागाचे कार्यालय गाठले आणि वन कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

    भीमा नदी पात्रा लगतच्या गार, नानवीज, सोनवडी या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या साखर कारखाने चालू झाल्याने ऊसतोड सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी ऊसतोड मजुरांना उसाच्या शेतात बिबट्याचे एक नर, एक मादी आणि दोन बछडे दिसले. भयभीत झालेल्या या ऊसतोड मजुरांनी जमीन मालकाला सांगितले. शेतकऱ्याने आणि ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे संपर्क साधल्याने ग्रामपंचायतीने २६ डिसेंबर २०२३ रोजी वन विभागाला पत्र्यावर करत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना हे बिबट्याचे कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी उसाच्या शेतांमध्ये दिसू लागले.

    काही शेतकऱ्यांनी याबाबत वन कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले आणि पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली. मात्र, घटनास्थळी जाऊन पाहणे करून शेतकऱ्यांना समजून सांगणे. अपेक्षित असताना संबंधित वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याने माणसावर हल्ला करू द्या, माणूस मरु द्या, मग वन विभाग त्या ठिकाणी पिंजरा लावेन, असे उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे संबंधित वन कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी लेखी तक्रार केली आहे. तसेच या भागात बिबट्याचा वावर असलेले ऊसतोड कामगार शेतमजूर महिला विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

    बिबट्याच्या दशेतेमुळे महिला शेतकरी शेतात काम करणे टाळत आहेत. त्यासाठी वनविभागाने गावात येऊन नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी करावी, बिबट्या व नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी काय उपयोजना केल्या जातील, त्या कराव्यात, या भागात पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुन बिबट्याला जेरबंद कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावा, शेतकरी व नागरिक त्यासाठी वन विभागाला पूर्णपणे सहकार्य करेल. अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाने दौंड तालुका वन विभागाकाडे केली.

    दरम्यान, याबाबत दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने बिबट्याच्या संदर्भात लेखी माहिती कळवली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, लोकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. तसेच संबंधित वन कर्मचाऱ्यांना समज दिली जाईल.