दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; पाटसमध्ये दोन शेळ्या केल्या फस्त

दौंड तालुक्यातील गार, नानवीज , सोनवडी या भागात मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना बिबट्यांचे कुटुंब दिसले होते. आता पाटस परिसरातील गार फाटा , मोहिते वस्ती,आव्हाड वस्ती या वस्त्यांवरील उसाच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला आहे.

    पाटस : दौंड तालुक्यातील गार, नानवीज , सोनवडी या भागात मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना बिबट्यांचे कुटुंब दिसले होते. आता पाटस परिसरातील गार फाटा , मोहिते वस्ती,आव्हाड वस्ती या वस्त्यांवरील उसाच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला आहे. पंचशील नगर येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला असून यात दोन शेळ्या दगावल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    अभयारण्यात आणि जंगली भागात केंव्हातरी आढळून येणारा बिबट्या आता ग्रामीण भागात सरासपणे दिसू लागला आहे. दौंड तालुक्यात मागील अनेक वर्षापासून बिबट्यांच्या कुटुंबाचे वास्तव आहे. भीमा नदी काठा लगतच्या गावांमध्ये त्याचा नियमितपणे वावर आहे. या बिबट्यांने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना लक्ष्य करून शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरांना भक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. दौंड तालुक्यातील भीमा नदी काठा लगतच्या पट्ट्यात दिसणारा हा बिबट्या आता मध्य भागातील गावांमध्ये ठीक ठिकाणी दिसु लागला आहे. मागील काही वर्षांपूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका खाजगी बसने बिबट्याला धडक दिल्याने या अपघात या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. काही वर्षांपूर्वी पाटस परिसरात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा एकदा पाटस परिसरातील आव्हाड वस्ती,मोहिते वस्ती आणि गार फाटा येथील काही शेतकऱ्यांना मंगळवारी ( दि १६) बिबट्या दिसून आला. त्याच रात्री बिबट्या ने भागवत यांच्या घरासमोरील अंगणातील पाळीव जनावरांच्या गोठ्यात असलेल्या शेळ्या, म्हैस या प्राण्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या असुन एक शेळी व एक पाळीव कुत्रा जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक रामेश्वर तेलग्रे, वनकर्मचारी बाबासाहेब कोकरे, रमेश कोळेकर तसे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर फरगडे यांनी धाव घेतली. परिसराची पाहणी करीत पंचनामा केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी व नागरिकांनी घाबरून न जाता लहान मुले महिला व ज्येष्ठांची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी एकट्यांनी घराबाहेर बाहेर पडू नये. रात्रीच्या वेळी शक्यतो शेतातील कामे टाळावेत. फटाक्यांचा आवाज करावा. जेणेकरून बिबट्या त्या आवाजाने तिथून निघून जाईल. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी टोळक्याने हातात काठी घेऊन शेतामध्ये काम करावे. बिबट्या आढळून आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनरक्षक तेलग्रे यांनी केले आहे.