Leopards enter Uruli Kanchan area

  उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमे वस्ती परिसरात एका शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि २२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

  नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  या हल्ल्यात शेळी ठार झाली असून, घटनास्थळी हवेली तालुका वनविभागाने पंचनामा करीत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केल्याची माहिती तालुका वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली.

  एक महिन्यांपूर्वी बिबट्याचा धुमाकूळ

  उरुळी कांचनपासून जवळच असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मचाले वस्ती परिसरात मागील एक महिन्यांपूर्वी बिबट्या धुमाकूळ घालत होता. याठिकाणी असलेली भटकी कुत्री या बिबट्याने फस्त केली होती. मात्र, मागील एक महिन्यांपासून बिबट्याला जेरबंद करण्याचा कोणताही प्रयत्न हवेली वनविभागाने अद्याप केला नसल्याने त्याचा वावर परिसरात वाढला आहे.

  हा निष्काळजीपणा सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर

  वनविभागाचा हा निष्काळजीपणा सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठणार का? असा प्रश्न उरुळी कांचन पंचक्रोशीत निर्माण झाला आहे. उरुळी कांचनजवळ मानवी वस्तीत बिबट्या येऊनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवीत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

  एक पिंजरा मिळाला नाही

  मागील एक महिन्यांपासून एक पिंजरा वनविभागाला याठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी मिळाला नाही ही बाब वनविभागाला नागरिकांच्या सुरक्षेचे काही देणे-घेणेच नसल्याचे निदर्शक आहे. गंभीर भीती सध्या पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन, वळती व परिसरातील नागरिक अनुभवत आहेत.

  बिबट्यांचा वावर आता नागरी वस्तीत वाढलेला

  जंगलात भक्ष व पाण्याच्या कमतरतेमुळे बिबट्यांचा वावर आता नागरी वस्तीत वाढलेला आहे, असे असताना वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी निष्काळजीपणा दाखवीत आहे. शिंदवणेसारख्या डोंगराळ भागाच्या गावात बिबट्या दाखल झाल्याने पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, वळती, तरडे, शिंदवणे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मेंढपाळ व पशुपालन करणार्‍यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने पिकांना रात्रीचे पाणी देणे अवघड झाले आहे. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांना सतावत आहे.

  अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात

  या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वास्तव्याने या भागात शेतकरी व शेतमजूर घाबरले आहेत. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

  वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य

  गिरमे वस्तीजवळच उरुळी कांचन शहराची मानवी वस्ती असल्याने वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य दिसत नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जिवावर बेतणार तर नाही ना अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  ग्रामस्थांकडून पिंजऱ्याची मागणी

  ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. शिंदवणे परिसरात बिबट्याच्या दाताचे व्रण दिसून येत आहेत. ते व्रण पायाचे ठसे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली आहे. दिवसा सदर ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, तसेच नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये. ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. – अशोक गायकवाड, वनक्षेत्र संरक्षक