यंदा पाऊस कमी अन् थंडीही कमीच! हवामानतज्ज्ञांची माहिती

यंदा एल-निनो वर्षात दरवर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडलेली नाही. खरंतर ८ डिसेंबरपासून काही प्रमाणात थंडीला सुरवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत आहे. थंडीची तीव्रता ठरविण्याचा निर्देशक किमान तापमान आहे.

    पुणे : यंदा एल-निनो वर्षात दरवर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडलेली नाही. खरंतर ८ डिसेंबरपासून काही प्रमाणात थंडीला सुरवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत आहे. थंडीची तीव्रता ठरविण्याचा निर्देशक किमान तापमान आहे. सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असावयास हवे. तरच चांगली थंडी जाणवते. पण किमान तापमान सरासरीहून अधिक असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

    दरवर्षी डिसेंबर हा अति थंडीचा महिना मानला जातो. थंडीची तीव्रता ही किमान तापमान किती आहे? यावर ठरविले जाते. सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असावयास हवे. तरच चांगली थंडी जाणवू शकते. परंतु ह्या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १७ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा कोकण व दक्षिण महाराष्ट्रात २ डिग्री सेल्सिअसच्या तर उर्वरित महाराष्ट्रात जवळपास ४ डिग्री सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे थंडी जाणवण्यास सुरवात झाली पण त्याचा म्हणावा तसा कडाका जाणवत नाही.

    विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे २७ डिग्री सेल्सिअसच्या तर विदर्भात २५ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास ४ डिग्री सेल्सिअसने तर कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात २ डिग्री सेल्सिअसने कमी आहे. त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी आहे.