‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’; कसब्यातील निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला.

पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये त्यांनी ‘नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू’, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!, असे त्यांनी म्हटले आहे.

हेमंत रासनेंना 61,771 मतं

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत.