आमचं लग्न करून द्याच! प्रेमी युगुलाचा १० तास पाण्याच्या टाकीवर हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसही नाकीनऊ

घरी आल्यानंतर काही दिवसातच संबंधित मुलगा घरातून पळून गेला. महिनाभरानंतर त्याला कसंबसं कुटुंबीयांनी शोधून काढलं. पण रविवारी दुपारी प्रेयसी महिला हिंगोलीहून बीडला आली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संबंधित महिला आणि तरुण शहरातील अंबिका चौकातील पाण्याच्या टाकीवर चढले. यानंतर मुलाने आपल्या कुटुंबीयांना फोन केला आणि आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

    बीड (Beed):  लग्नाला घरच्यांकडून होकार मिळवण्यासाठी बीडमधील एका प्रेमीयुगुलानं तब्बल 10 तास पाण्याच्या टाकीवर हाय होल्टेज ड्रामा केला आहे. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल ठिय्या दिला आहे. कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी बराच वेळ समजूत घालूनही हे जोडपं पाण्याच्या टाकीवरून उतरायला तयार नव्हतं. शेवटी लग्नासाठी कुटुंबीय तयार झाल्यानंतरच ते दोघंही खाली उतरले आहेत. संबंधित प्रेमीयुगुलानं लग्नासाठी कुटुंबासह पोलिसांना देखील नाकीनऊ आणलं आहे.

    बीड शहरातील रहिवासी असणारा तरुण काही दिवसांपूर्वी हिंगोलीत कामानिमित्त वास्तव्याला गेला होता. याठिकाणी गेल्यानंतर त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. कालांतराने दोघांच्या या ओळखीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं होतं. पण त्यांचं हे गुपचूप प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. याची खबर मुलाच्या घरच्यांना मिळाली. आपल्या मुलाचं ज्या महिलेवर प्रेम आहे, तिचं आधीपासूनच लग्न झालं असून सध्या नवऱ्यापासून विभक्त राहते. तसेच तिला दोन मुलंही आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला परत बीडला आणलं.

    पण घरी आल्यानंतर काही दिवसातच संबंधित मुलगा घरातून पळून गेला. महिनाभरानंतर त्याला कसंबसं कुटुंबीयांनी शोधून काढलं. पण रविवारी दुपारी प्रेयसी महिला हिंगोलीहून बीडला आली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संबंधित महिला आणि तरुण शहरातील अंबिका चौकातील पाण्याच्या टाकीवर चढले. यानंतर मुलाने आपल्या कुटुंबीयांना फोन केला आणि आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली.

    कुटुंबीय याठिकाणी आल्यानंतर, संबंधित मुलानं आमचं दोघाचं आताच लग्न लावून द्या; नाहीतर आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. कुटुंबीयांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तो कुटुंबीयांचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्याने टाकीवरून उडी घेण्याचा दोन-तीन वेळा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावं लागलं. तब्बल दहा तास हाय होल्टेज ड्रामा केल्यानंतर संबंधित प्रेमीयुगुल पाण्याच्या टाकीवरून खाली उतरलं.