“प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    मुंबई– आज देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.  प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना अमंलात आली, त्याची आठवण म्हणून आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. विधान भवनात देखील ध्वजारोहण करण्यात आला आहे. ध्वजारोहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. आज कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथ दिसतील. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेच दर्शन या चित्ररथांमधून होईल. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 17 चित्ररथ असतील. त्याशिवाय वेगवेगळी मंत्रालय आणि विभागांचे सहा चित्ररथ असतील.

    मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘आज भारत जगातील एक सशक्त आणि सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे राष्ट्र आहे. विविधतेने नटलेला खंडप्राय भारत जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील आघाडीचे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राविषयीही जगभरात मोठी उत्सुकता आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत आपल्या महाराष्ट्रानेही मोठे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीच्या आलेखात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिनही म्हटलं जाते.

    ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या परिवारांप्रति कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.