उकळते तेल ओतून पत्नीला मारणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा; पाचपावलीत घडला होता थरार

झोपलेल्या पत्नीवर उकळते तेल टाकून अघोरी खून (Crime in Nagpur) करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नागूर यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

    नागपूर : झोपलेल्या पत्नीवर उकळते तेल टाकून अघोरी खून (Crime in Nagpur) करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नागूर यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सतीश सुखदेव भिमटे (39), असे आरोपीचे नाव असून तो पंचशीलनगर येथील रहिवासी आहे. भावना सतीश भिमटे (30), असे मृत महिलेचे नाव आहे.

    आरोपी सतीश हा कोणताही कामधंदा करत नव्हता. भावना ही बचत गटातून कर्ज घेऊन दोन मुले आणि पती, असा घरसंसार चालवीत होती. कर्जाचे ओझे वाढत होते. त्यातच सतीश हा भावनाच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी भांडण करत होता.

    सतीश तिला अनेकदा मारझोडही करायचा. घटनेच्या दिवशी 22 ऑक्टोबर 2021 रोजी पाहाटे 5 वाजताच्या सुमारास सतीशने गाढ झोपेत असलेल्या भावनाच्या अंगावर उकळलेले तेल ओतले. त्यामुळे ती गंभीररित्या भाजली गेली. तिला उपचारार्थ मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले असता भावना मरण पावली.

    पहिल्यांदा पाचपावली पोलीसांनी कलम 307 आणि नंतर 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. 24 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन सूर्यवंशी यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली.