Life of Pandharpur's Vitthal Temple to Extend to 700 Years, Ancient Stone Flooring in Maharashtra's Adore Temple

  पंढरपूर : भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी  मंदिराच्या विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरु असून विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षांपूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसविण्यात येत आहे.
  73 कोटीच्या आराखड्यात मंदिराचे काम वेगात
  मंदिरातील नंतरच्या काळात बसविण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. विठ्ठल गाभाऱ्यात बसवलेल्या या ग्रेनाईटमुळे दगडांचे श्वसन थांबले होते. यामुळे गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात दमटपणा राहत असल्याने याचा त्रास भाविकांना तर होताच होता, शिवाय देवाच्या मूर्तीवर देखील याचा विपरीत परिणाम जाणवत होता. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याची दखल घेतल्यानंतर पुरातत्व विभागाने तातडीने या फारशा हटविण्याच्या सूचना दिल्या आणि आता या 73 कोटीच्या आराखड्यात हे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरु आहे
  मंदिराचं रुपडं पालटू लागलं
  सध्या विठ्ठल मंदिरातील सोळखांबी, चौखांबी आणि गाभारा तसेच रुक्मिणी मातेचा गाभारा येथे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. या भागात असणारे दगडी खांब पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने साफ करीत असल्याने या नक्षीदार खांब, छत आणि फ्लोरिंग याचे मूळ दगडी आकर्षक वैभव दिसू लागलं आहे. विठ्ठल मंदिरातील दगडांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आता अतिशय आकर्षकरीतीने समोर येऊ लागले असून मंदिरातील जुने दगडी फ्लोरिंग बाहेर येताच शेकडो वर्षांपूर्वी लोकांनी त्यावर लिहिलेला मजकूर दिसू लागला आहे. आता पुरातत्व विभाग हे मजकूर नोंदवण्याचे काम करणार असून मंदिराच्या इतिहासाची मोठी माहिती यामुळे समोर येऊ शकणार आहे.
  मंदिराचं आयुष्य अजून 700 वर्षापर्यंत वाढणार
  विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिराचे बरंचसं काम पूर्ण झालं असून आता हे मंदिर त्याच्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या रूपात दिसू लागलं आहे. त्याशेजारी असणारी बाजीराव पडसाळीचंही काम पूर्ण होत आल्याने यालाही त्याचा पुरातन लूक मिळाला आहे. याच भागात देगलूर आणि कर्नाटकमधून आणलेल्या काळ्या पाषाणात घडवलेलं फ्लोरिंग बसविण्याचं काम सुरु आहे. विठ्ठल सभामंडपातील पेशवेकालीन भव्य सागवानी लाकडी सभामंडपालाही पॉलिश करायचे काम पुरातत्व विभाग करीत असून यामुळे मंदिराची शोभा वाढू लागली आहे.