liquor

मद्याच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या जीवघेण्या विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ ही संस्था काम करतेय.

    अमरावती : आजवर तुम्ही वेगवेगळ्या संमेलनाबद्दल ऐकलं असेल. अगदी साहित्य संमेलनापासून ते विविध समाजांच्या संमेलनाचे आयोजन आजवर होत आलं आहे. पण अमरावतीत (Amravati News) आता चक्क मद्यपींचं संमेलन भरणार आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरं आहे. या मद्यपींच्या संमेलनात (Meeting Of Liquor Drinkers) मद्याचे व्‍यसन जडलेले आणि त्‍या विळख्‍यातून बाहेर पडलेले लोक आपले अनुभव सांगणार आहेत. शनिवारी 10 जून रोजी शहरातील नवाथे रेल्वे क्रॉसिंग परिसरातील साईकृष्ण मंगल कार्यालयात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. (Maharashtra News)

    मजेसाठी प्राशन केलेले मद्य, कालांतराने व्यसन होते. व्यक्तीने व्यसनावर नियंत्रण न ठेवल्यास कुटुंबावरच संकट कोसळते. मद्याच्या या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या जीवघेण्या विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ ही संस्था काम करतेय. या आंतरराष्ट्रीय संस्थेची एक शाखा अमरावतीतही आहे. खूप जास्त प्रमाणात मद्य सेवन हा एक आजार आहे. अशा आजारातून व्यक्तीला बरे करण्यासाठी कुणा औषधाची नव्हे तर मानसिकता बदलण्याची गरज असते. याच विचारातून या स्‍वयंसेवी संस्‍थेची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

    दारूमुळे अनेक कुटुंबांची परवड होताना दिसते. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शिवाय अनेकांना आरोग्यविषयक समस्यादेखील उद्भवतात. फक्त दारू पिणारा मद्यपीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ बसते. मद्यपानाच्या अतिरेकामुळे कौटुंबिक वाददेखील निर्माण होतात. दारूच्या नशेत अनेकदा लोक अशी कृत्य करतात ज्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

    ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेच्या पुढाकारातून शहरातील साधारण दोनशे नागरिक स्वतःला आलेले वाईट अनुभव दुसऱ्यांना येऊ नये या हेतूने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मद्यपानापासून मुक्तता मिळवलेल्या या दोनशे लोकांमध्ये अनेक डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते आणि सर्वसामान्‍य नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व लोक या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना स्वतःला आलेले अनुभव सांगून दुसऱ्यांना मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत.