चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ!कृषी पर्यटनावर आमदार, जिल्हाधिकारी व सिईओ फिदा

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कृषी पर्यटनात केलेले उत्कृष्ठ नियोजन पाहून आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व सिईओ दिलीप स्वामी भारावून गेले.या प्रसंगी कचरा मुक्त ग्राम अभियानाचा गावपातळीवर शुभारंभ आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला.

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कृषी पर्यटनात केलेले उत्कृष्ठ नियोजन पाहून आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व सिईओ दिलीप स्वामी भारावून गेले.या प्रसंगी कचरा मुक्त ग्राम अभियानाचा गावपातळीवर शुभारंभ आमदार सुभाष देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला.

    सोलापूर सोशल फाउंडेशन आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या कृषी पर्यटन क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे उद्घाटन करताना सिईओ स्वामी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशन चे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी हे होते.

    स्वच्छतेचे सातत्य ठेवा – सिईओ दिलीप स्वामी

    सोलापूर जिल्ह्यातील पहिले तीन मध्ये निर्मलग्राम असलेले चिंचणी ने कचरा मुक्त ग्राम अभियानात देखील चांगले पाऊल टाकले आहे. कृषी पर्यटनाचे ठिकाणी स्वच्छता असेल तर सोन्याहून पिवळे आहे.सध्या मासिक पाळी व्यवस्थापक सप्ताह आहे. या कालावधीत मासिक पाळी बाबत चे समज व गैरसमजा बाबत प्रबोधन करा. महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या. जैविक कचरा बरोबर वैद्यकीय कचरा कडे देखील गांभार्याने पहा. कोरोना मुक्त असलेले चिंचणी गावात मोहन अनपट सारखे तरुण युवकांनी चेहरामोहरा बदलला आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

    कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दिलीप स्वामी म्हणाले , गावाचा शाश्वत विकास करायचा असेल तर पुढच्या पिढीचा विचार करून शाळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. बालविवाहांच्या बाबतीत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे ही अतिशय कटू वस्तुस्थिती आहे असे सांगताना त्यांनी या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे विशद केले.

    आपल्या गावात उपायोजना करताना केवळ व्यसनमुक्ती न करता व्यसनाच्या मूळ कारणांचा विचार केला पाहिजे आणि त्यावर घाव घातला पाहिजे, असे प्रतिपादन केले.
    शिवार फेरी काढून आमदार व वरिष्ठ अधिकारी यांनी चिंचणी कृषी पर्यंटन केंद्राची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भाकरे यांनी केले तर समृद्ध गाव समिती अभियान समितीचे अध्यक्ष मोहन अनपट यांनी चिंचणीच्या विकासाची सविस्तर माहिती दिली.

    प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे आणि अतिरिक्त जीएसटी आयुक्त वैशाली पतंगे- ठोंबरे यांनीही उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. ठोंबरे यांनी, ग्रामीण भागातल्या पर्यावरण प्रेमी उत्पादनांना शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगितले.

    सरपंचाच्या कल्पनांचा समावेश करू-प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे

    सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांच्या कल्पनांचा समावेश करून पूर्ण जिल्ह्याचा एक विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल असे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी जाहिर केले.

    या कार्यशाळेत पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, पर्यटन तज्ञ रफिक नदाफ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय कुचेकर यांनी केले.

    … तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल:आ. देशमुख

    आमदार सुभाष देशमुख यांनी, अध्यक्षीय समारोप केला. सरपंच हाच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे सरपंचांनी निर्धार केला तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल, असे प्रतिपादन केले.
    या कार्यशाळेस सोलापूर सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक विजय पाटील,विपुल लावंड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, सल्लागार, प्रतिनिधी उपस्थित होते

    चिंचणी : रम्य पर्यटन स्थळ

    पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव पुनर्वसित असून ते उत्तम कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. सध्या या स्थळाच्या ठिकाणी विविध संस्था संघटनांचे कार्यक्रम संमेलने आणि बैठका मोठ्या प्रमाणावर होत आहेत. भरपूर वृक्षारोपण केलेल्या या ठिकाणी रम्य वातावरणात सर्व सुख सोयी उपलब्ध असल्याने यावर्षी चिंचणीच्या पर्यटन स्थळामुळे महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे अशी माहिती मोहन अनपट यांनी दिली.