
पीएम किसान सन्मान योजनेत (PM Kisan Samman Yojana) नोंदणी झाल्यानंतर व पहिले तीन हप्ते मिळाल्यानंतर शेतकरी जिवंत असताना मयत दाखवून या शेतकऱ्याचे पुढील हप्ते बंद करण्यात आले आहेत.
आलेगाव : पीएम किसान सन्मान योजनेत (PM Kisan Samman Yojana) नोंदणी झाल्यानंतर व पहिले तीन हप्ते मिळाल्यानंतर शेतकरी जिवंत असताना मयत दाखवून या शेतकऱ्याचे पुढील हप्ते बंद करण्यात आले आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून या योजनेचा लाभ आपल्याला सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.
पातूर तालुक्यातील ग्राम हिंगणा पो. दिग्रस बु. येथील रहिवासी मधुकर सदाशिव उजाडे यांनी पीएम किसान सन्मान योजनेसाठी सप्टेंबर 2019 मध्ये नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर त्यांना या योजनेचे पहिले तीन हप्ते सुद्धा मिळाले. मात्र, त्यानंतर हप्ते मिळणे बंद झाले. याबाबत त्यांनी पातूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी अहवाल काढण्यास सांगितले. सेतू केंद्रावरून अहवाल काढला असता त्यावर सदर शेतकरी मयत दाखविल्याचे आढळून आले.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा ही अडचण दूर झाली नाही. त्यामुळे मधुकर उजाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविली. तेथे सुद्धा या प्रकरणात असमर्थता दर्शविली. त्यामुळे उजाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपण जिवंत असूनही पीएम किसान सन्मान योजनेच्या यंत्रणेत आपल्याला मयत दाखविण्यात येत असल्याने ही तांत्रिक अडचण दूर करून आपल्याला राहिलेले हप्ते मिळवून देण्यात यावेत व योजनेचा लाभ सुरू करण्यात यावा याबाबत विनंती केली आहे.