Lok Sabha 2024 Clear Indication of Nashik Candidature From Chhagan Bhujbal Calling Devendra Fadnavis Name They Told a secret

Nashik Lok Sabha 2024 : लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर महायुतीतील जागांचा तिढा तसाच असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये नाशिकच्या जागेची चर्चा चांगलीच गाजली आहे. अचानक मंत्री छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्याने चर्चांणा मोठे उधाण आले होते. आता तर नाशिकच्या जागेवर उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याचे खुद्द छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  Chhagan Bhujbal : लोकसभेची तारीक झाल्यानंतर महायुतीमधील अनेक ठिकाणचा जागेंचा तिढा पाहायला मिळाला. महायुतीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) पेच कायम असल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्याकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) तिकीटासाठी जोर लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपदेखील या जागेसाठी आक्रमक आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
  उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह
  छगन भुजबळ म्हणाले की, उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता. दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली. मला बोलविण्यात आले. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला यायला निघालो. मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. फडणवीस यांना विचारले माझ्या उमेदवारीची चर्चा आहे ते खरे आहे का? फडणवीसांनी मला सांगितले हो खरे आहे. त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल, असे म्हणत मंत्री छगन भुजबळांनी उमेदवाराची संकेत दिले आहेत.
  महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार
  ज्याला उभे राहायचे असते तो चार पाच महिन्यांपासून चर्चा करतो. मात्र माझे नाव अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरु झाली. त्यावेळी ही गोष्ट मिडियापर्यंत पोहोचली. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारीचा फार आग्रह आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरु आहे. जो निर्णय वरिष्ठ देतील, तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत. महायुतीकडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा सुटली तर राष्ट्रवादीचे घड्याळ हीच निशाणी असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
  मी मराठ्यांना विरोध कधीच केला नाही
  मराठा समाजाकडून छगन भुजबळांविरोधात होर्डिंग लावण्यात आले. याबात ते म्हणाले की, माझ्या नावाचे होर्डिंग लागले. मी पुन्हा सांगतो मी मराठ्यांना विरोध कधीच केला नाही. मी आरक्षणाला सपोर्ट केला. ओबीसीमध्ये नको वेगळे आरक्षण द्या, ही मागणी होती. ती मान्य झाली आहे. ही माझी चूक असेल तर मी ती चूक केली आहे. असे होर्डिंग का लावतात? मला माहित नाही. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या, असे त्यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांना अडवले त्यातर काहीच बोलल्या नाहीत, प्रणिती शिंदे या कधी मराठा समाजाविषयी बोलल्या का? त्यांना का विरोध केला. त्या दलित, वंजारी आहेत म्हणून का? या समाजाच्या उमेदवाराने उभे राहायचे नाही का? हे तरी सांगा. असा बोर्ड लावून मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. राज्यभर चांगले चांगले मराठा समाज नेते आहेत.  त्यांच्या विरोधात देखील बोर्ड लागतील, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.
  छगन भुजबळांचा हेमंत गोडसेंना टोला
  हेमंत गोडसे तिकिटाची मागणी करत आहेत. वरिष्ठ काय तो निर्णय घेतील मला तो मान्य असेल. आमच्या उमेदवारांची यादी दोन-तीन दिवसांत जाहीर होईल. हेंमत गोडसे यांनी प्रचार सुरू केला असला तर चांगले आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असो त्याला फायदा होईल, असा टोला त्यांनी हेमंत गोडसेंना लगावला आहे.