Lok Sabha Election 2024 : Voting for Lok Sabha can be done sitting at home for the first time; Information of the Chief Electoral Officer

  पुणे : मागील अनेक दिवसांपासून लोकसभेची तयारी पूर्ण झाल्याची चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला सध्या जोमाने सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, आता लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता लोकसभेसाठी घरून मतदान करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत असतानाच ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

  राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले असून निवडणूक आयोगाकडून देखील तयारी केली जात आहे. या आगामी निवडणुकीत आता पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे. याला परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

  दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली लोकसभेची तयारी

  त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, निवडणूक पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे. निवडणुकांच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, सध्या जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांना भेट देणे सुरू आहे. पुण्यात पहिली भेट आहे. यावेळी तयारी पाहणी दौरा तसेच आढावा बैठक घेतल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

  पहिल्यांदाच घरी बसून मतदान

  या आगामी निवडणूकीमध्येकाही धोरणात्मक बदल झाले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे, त्याला परवानगी देण्यात आली आहे, ८० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांग व्यक्ती यांना आता घरी बसून मतदान करता येणार आहे, असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

  १२ड फॉर्म या लोकांना पर्याय

  निवडणूक जाहीर झाली की, १२ड फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन घेऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. मतदान होईल त्याअगोदर त्यांचे मतदान करून घेण्यात येईल, मतदान मोठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धांना सांगणार आहोत, त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोक बाहेर पडतील, असेही देशपांडे यांनी सांगितले.

  घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग

  तसेच यावेळी त्यांनी घरी बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोट निवडणुकीत करण्यात आला होता, असेही यावेळी सांगितले आहे. त्यामुळे घरी बसून व्हीडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.