POK वरुन महाराष्ट्राचं राजकारण रंगलं! ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावलं

प्रचारावेळी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेऊ असे वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आले आहे.

    मुंबई : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आता अजून तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरु असून आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहे. भाजप श्रेष्ठींचे महाराष्ट्र दौरे देखील वाढले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. प्रचारावेळी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेऊ असे वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र सामना मधून अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागण्य़ात आले आहे.

    शेजरील राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत त्यामुळे त्यांचा आदर करायला हवा अशा आशयाचे वक्तव्य कॉंग्रेसने केले होते. त्यामुळे भाजपने जोरदार टीका केली. यावरुन सामनामधून अमित शाह यांना धारेवर धरले आहे. काश्मीर मिळविण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. ती छाती कॉंग्रेसची नाही, असं भाजप सरकार 2014 पासुन म्हणत आहेत. मागील दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. तरीही पाकव्याप्त काश्मीर ते भारतात आणू शकले नाही. मोदींना कुणी अडवलं होतं, याचा खुलासा अमित शाहंनी करावा अशी मागणी सामनामधून करण्यात आली आहे.

    अमित शाह पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरत नाहीत. त्यांनी पुलवामा हल्ल्यात वापरलेले 400 किलो आरडीएक्स कुठून आलं ते सागांवं. निवडणूक जिंकण्यासाठी पाकव्याप्त पाकिस्तान परत घेण्याचं वक्तव्य शाह करत आहेत. परंतु त्यांनी मणिपूरवर ताबा मिळवणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये आज देखील हिंसाचार आणि अत्याचार सुरू आहेत. तेथील जनता अशांत आहे. असे ठाकरे गटाचे मुखपत्र सामना म्हटले आहे.