न्यायालयांच्या दीर्घकालीन सु्ट्ट्यांवर डोळा? उच्च न्यायालयात याचिकेतून सुट्ट्यांवर आक्षेप

या दीर्घकालीन न्यायालयीन सुट्ट्यांमुळे न्यायदान प्रक्रिया आणखी कोलमडली आहे. या सुट्टया केवळ उच्चभ्रू वकिलांच्या सोयीसाठी आहे, असा दावा करणारी याचिका सबिना लकडावाला महिलेने ॲड. मॅथ्यू नेदुमपारा आणि ॲड. शरद कोळी यांच्यामार्फत केली आहे.

    मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court Vacation Issue) उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळी आणि नाताळच्या नावाखाली महिनाभर किंवा आठवडे देण्यात येणाऱ्या सुटट्यांना याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे (The plea has challenged the month long or week long holidays in the name of summer vacation Diwali and Christmas). न्यायालयाला सुट्ट्या देण्याच्या ब्रिटिशकालीन प्रथा किंवा नियमाला याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी नोव्हेंबर महिन्यात ऐकण्याचे निश्चित केले.

    या दीर्घकालीन न्यायालयीन सुट्ट्यांमुळे न्यायदान प्रक्रिया आणखी कोलमडली आहे. या सुट्टया केवळ उच्चभ्रू वकिलांच्या सोयीसाठी आहे, असा दावा करणारी याचिका सबिना लकडावाला महिलेने ॲड. मॅथ्यू नेदुमपारा आणि ॲड. शरद कोळी यांच्यामार्फत केली आहे. दिवाळीनिमित्त उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांची दीर्घ सुट्टी आहे.

    तातडीच्या प्रकरणांसाठी सुट्टीकालीन न्यायालय कार्यरत असले तरीही संख्या कमी असल्याने न्याय मिळवण्याच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक न्यायाधीश हे इंग्रज असल्यामुळे भारतातील उष्ण वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना कठीण जात होते.

    त्यामुळे समुद्रमार्गातून इग्लंडला प्रवास करण्यासाठी लांब सुट्टीची आवश्यकता होती. त्यामुळेच या सुट्ट्यांची प्रथा सुरू झाली. परंतु आज ही स्थिती नसून सण किंवा उन्हाळी सुट्टी नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्यात न्यायालयाने पूर्ण बंद ठेवण्याऐवजी निम्म्या क्षमतेने चालवावीत, अशी मागणी याचिकाकर्तीने केली आहे.

    गुरूवारी याचिकेवर न्या.संजय गंगापूरवाला आणि न्या.आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, उच्च न्यायालयाची दिनदर्शिका गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बनवली होती, आता त्या विरोधात याचिका का ?, असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला आणि दिवाळीनंतर १५ नोव्हेंबर रोजी याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले.