गणेशोत्सवावर तिसऱ्या डोळ्यातून नजर..! पुणे शहर परिसरात सीसीटीव्ही

शहरात १५ ठिकाणी पोलीस मदत केंद्र

    पुणे : पुण्यातील गणेशोत्सवावर पोलिसांची यंदाही तिसऱ्या डोळ्यातून नजर असून प्रथमच फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसतील हॉलमध्ये “मोठी” स्क्रीन लावण्यात आली आहे. तेथून मध्यभागातील रस्ते, गर्दी तसेच गणेश मंडळ आणि इतर परिसरावर देखरेख केली जात आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून पोलीस नजर ठेवून आहेत. तेथूनच अडचणीच्या वेळी व गर्दीवर नियत्रंण ठेवण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. यासोबत गर्दी होणाऱ्या काही मंडळांनी तसेच परिसरात सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे त्याचाही मदत पोलिसांना मिळत आहे.

    पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे. फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मानाचे तसेच दगडूशेठ गणपती आणि इतर महत्वाची मंडळे येतात.

    पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवासाठी राज्यासह परदेशातील नागरिक येत असतात. लाखो भाविक या दहा दिवसांच्या कालावधीत दर्शन तसेच देखावे पाहण्यास येतात. यंदा रविवारपासून देखावे पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यानूसार पुणे पोलिसांनी नियोजन केले आहे. पुण्याच्या मध्यभागातील रस्त्यांवरील पोलीस बंदोबस्त यंदा मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. जागोजागी पोलीस दिसून येत असल्याने नागरिकांना अडचणी येत नसल्याचे दिसत आहे. त्यासोबतच १५ ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारले आहेत. त्या मदत केंद्रावरून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. माईकवरून वेळोवेळी सूचना दिल्याने नागरिकांची गर्दी होत नसल्याचे पाहिला मिळाले आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा स्क्रीन बसविण्यात आला आहे. त्याठिकाणी ३ अधिकारी व २० कर्मचारी २४ तास नजर गर्दी, पोलीस बंदोबस्त व मंडळांवर आणि इतर हालचालींवर नजर ठेवून आहेत. येथून वेळोवेळी बंदोबस्तावरील मार्गदर्शन केले जात आहे. जागोजागी मदत केंद्र सुरू केल्याने नागरिकांनाही अडचणी येत नसल्याचे दिसत आहे. यासोबतच साध्या गणवेशात गुन्हे शाखेची पथके, तसेच सायंकाळी चार ते रात्री १२ पर्यंत एक अप्पर पोलीस आयुक्त व एक पोलीस उपायुक्त देखील बेलबाग चौक तसेच मध्यभागात बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत.

    गणेश मंडळांनीही सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याचा अॅक्सेसही पोलीस कंट्रोल रूमला घेण्यात आल्याने त्याचा फायदा पोलिसांना होत आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच चोरट्यांवर महिला छेडछाड रोखण्यासाठी परिमंडळ एकच्या दोन पथके आहेत. त्यांच्याकडून २४ तास गस्त घातली जात आहे. हीच पथके मंडळांना देखील सातत्याने भेटी देत आहेत. त्यामुळे यंदा बंदोबस्त तगडा असल्याचे दिसत आहे.