ताथवडा घाटात लूटमार करणारी टोळी जेरबंद ; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी

फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात युवकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व कुरिअर पार्सल लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई १७ रोजी नेर तलावाजवळ करण्यात आली.

    सातारा : फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात युवकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व कुरिअर पार्सल लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई १७ रोजी नेर तलावाजवळ करण्यात आली. यामध्ये अजय संभाजी मदने, वय २१, राहणार डिस्कळ, तालुका खटाव, अक्षय संभाजी जाधव, वय २७, राहणार मोहोळ, तालुका खटाव, निखिल उमाजी बुधावले, वय २१, आकाश प्रभाकर जाधव, वय २२ राहणार कोरेगाव, आदित्य शिरतोडे, वय २१, ललगुण, ता खटाव यांना नेर परिसरातील डोंगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन मोटरसायकलीसह एकूण २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी साडेचार वाजता ऋषिकेश अनिल मिसाळ, कोळकी, तालुका फलटण हा मानेवाडी येथे कुरिअर पार्सल देण्यासाठी ग्राहकांची वाट बघत पुसेगाव फलटण रोडवरील मानेवाडी बस स्टॉपवर थांबला असता फलटण बाजूकडून दोन मोटरसायकलून आलेल्या सहा लोकांनी त्याचे जवळ जाऊन पार्सल आहे का असे बळजबरीने विचारले त्यातील एकाने ऋषिकेश मिसाळ याला गाडीवरून खाली पाडून त्याच्या डोळ्यात दगड मारून त्याला जखमी केले चौघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडे रोख दहा हजार रुपये, पंधरा हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट व विविध पार्सल असलेला २७ हजार रुपयाच्या वस्तू असा एकूण ५२ हजार मुद्देमाल असणारी बॅग जबरदस्त चोरून नेली.

    पोलिसांनी फलटण तालुका पिंजून काढत तसेच मानेवाडी भागात पेट्रोलिंग करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित इसमांची माहिती मिळवली. एके ठिकाणी शेतात काम करणारे शेतकऱ्याने सदर इसम बीबी रोडला गेल्याचे सांगितले पोलिसांनी नेर धरणाच्या भरावा जवळून पाठलाग करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. वरील गुन्हेगार ताथवडा घाटात छोट्या मोठ्या चोऱ्या सतत करत होते सदर आरोपींपैकी अजय मदने व निखिल बुधावले यांनी १३ ऑक्टोबर रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील कामगाराला तलवारीचा धार दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सागर आरगडे, विक्रांत बनकर, हनुमान दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलावडे यांनी सहभाग घेतला होता.