अपंगत्वाचा फायदा घेत केली लोकांची लूट, मानपाडा पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय सेल्सच्या समोर एक चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता.

    कल्याण-डोंबिवली : डाेंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एक अजब चैन चोरणाऱ्या टोळीला पकडले आहे. एक बाईक चालवायचा तर दुसरा त्याच्या मागे बसून चैन स्नॅचिंग करायचा. धक्कादायक म्हणजे जो बाईकवर मागे बसायचा तो पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.

    डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय सेल्सच्या समोर एक चैन स्नॅचिंगची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला होता. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी अविनाश वनवे, प्रशांत आंधळे, संपत फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीपर्यत पोहचले. रायगड येथील मानगाव परिसरातून दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सुखवीर रावल आणि विरु राजपूत अशी या चोरट्यांची नावे आहेत.

    धक्कादायक म्हणजे सुखवीर रावल हा पायाने अपंग आहे. तो बाईकवर मागे बसतो. विरु हा बाईक चालवितो. संधी मिळताच सुखवीर रावल हा नागरीकांच्या अंगावरील दागिने हिसकवितो. त्यानंतर दोघेही बाईकवरुन पसार होत होते. या दोघांनी पाच शहरात धुमाकुळ घातला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी साडे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकीकडे समाजाकडून अपंग असलेल्या व्यक्तीविषयी सहानुभूती दाखविली जाते. मात्र त्याच अपंग व्यक्तीकडून अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे केले जात असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.