कपाशीचे ३५ हजार हेक्टरवर नुकसान; आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा दुष्काळाच्या मदतीची…

तालुक्यात कृषीच्या पथकांनी दुष्काळासंदर्भात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले. यात खरिपाच्या ४२ हजार ३७३ लागवडी योग्य क्षेत्रापैकी ४२ हजार ३२८ हेक्टरवर खरिपाची पिके बाधित झाल्याचा खळबळजनक अहवाल शनिवारी तालुका कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला.

  सोयगाव : तालुक्यात कृषीच्या पथकांनी दुष्काळासंदर्भात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले. यात खरिपाच्या ४२ हजार ३७३ लागवडी योग्य क्षेत्रापैकी ४२ हजार ३२८ हेक्टरवर खरिपाची पिके बाधित झाल्याचा खळबळजनक अहवाल शनिवारी तालुका कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीची प्रतीक्षा लागली आहे.

  सोयगाव तालुक्यात शासनाने अतिगंभीर दुष्काळाची घोषणा महिनाभरापूर्वी केली होती. दुष्काळात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या कपाशी, तूर, मका, सोयाबीन, उडीद, ज्वारी, बाजरी या प्रमुख खरिपाच्या पिकांची सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या कृषीच्या पथकांनी बाधित क्षेत्राचे पंचनामे हाती घेतले होते. यामध्ये तालुक्यात दुष्काळाच्या छायेत ४२ हजार ३२८ हेक्टरवर पिके ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

  सोयगावचा महसूल विभाग केवळ ‘सह्याजीराव’

  महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर पायही ठेवला नव्हता. त्यामुळे दुष्काळाचा भार केवळ कृषी विभागावरच होता. महसूल विभाग दुष्काळाच्या पंचनामा अहवालावर केवळ सह्याजीराव ठरला आहे.

  दुष्काळाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

  तहसीलदार मोहनलाल हरणे यांनी एकाही शेतात दुष्काळाची पाहणी केली नाही. महसूल विभागाने दुष्काळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे तहसील कार्यालयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला.